नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान १५७ प्रकल्पांचे उद्घाटन केले. काँग्रेसवर टीकास्त्रही सोडले. पण लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम व आचारसंहिता जाहीर झाल्यापासून पाच दिवसांत ते काहीही बोललेले नाहीत. त्यांनी मौन धारण केले आहे.व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद््घाटने करणाऱ्या, संवाद साधणाऱ्या मोदी यांनी पाच दिवसांत काहीही केलेले नाही. सूत्रांनी सांगितल्यानुसार मोदींच्या मौनाचे कारण ‘होलाष्टक’ काळ सुरू झाला हे आहे. होलाष्टक हा अशुभ काळ मानला जातो व होळीच्या आधीचे आठ दिवस हे अनिष्ट मानले जातात. होळी २१ मार्च रोजी आहे. त्यामुळे तोपर्यंत मोदी मोठ्या, जाहीर कार्यक्रमांत बोलण्याची शक्यता नाही. भाजपाने ३६ पक्षांसोबत युती पूर्ण केलेली होती. आता काम सुरू आहे जाहीरनाम्यावर. प्रचाराच्या व्यूहरचनेची जबाबदारी अरुण जेटली यांच्याकडे आहे. मोदी वरिष्ठ नेत्यांशी सातत्याने भेटत असून प्रचार मोहिमेला अंतिम रूप देत आहेत. ‘मोदी है तो मुमकीन है’अथक परिश्रम करून ठरविलेले काम तडीस नेणारा नेता या भारतीयांच्या जनमानसात ठसलेल्या प्रतिमेचे मतांच्या रूपाने भांडवल करण्यासाठी भाजपाने निवडणुकीत ‘मोदी है तो मुमकीन है’ हे घोषवाक्य वापरायचे ठरविले आहे.
मौन की बात! मोदींनी पाच दिवसांत उच्चारला नाही एकही शब्द; 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 7:22 AM