उत्तरकाशी : उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यातून ४१ कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर एका दिवसानंतर बुधवारी ही जागा पूर्णपणे निर्जन दिसली. तेथे अक्षरश: सन्नाटा होता. दरम्यान, एम्स-ऋषिकेशच्या डॉक्टरांनी सर्व कामगारांची तपासणी करून त्यांना घरी परतण्याची परवानगी दिली आहे.
मोठ्या बचाव मोहिमेदरम्यान बंद करण्यात आलेले बोगद्याभोवतीचे रस्ते बुधवारी खुले करण्यात आले. बोगद्यावर पोलिसांची एक तुकडी मात्र तैनात करण्यात आली आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले की, बोगद्याचे बांधकाम काही दिवस बंद राहणार आहे. एका कामगाराने सांगितले की, त्याला दोन दिवस विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे, त्यानंतर त्याला कंत्राटदाराकडून कळवले जाईल. दुसरीकडे सुरक्षा तपासणी होईपर्यंत काम बंद राहील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. बचाव पथकातील सदस्य आपली यंत्रे गुंडाळून ठेवताना दिसत आहेत.
कामगारांवर झाली पैशांची बरसातबोगदा बांधणारी नवयुग ही कंपनी आता बोगद्यातून सुरक्षितपणे बाहेर काढलेल्या कामगारांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई देणार आहे.याच वेळी सर्व मजुरांना दोन महिन्यांच्या पगारासह रजाही देण्यात येणार आहे. सर्वांत मोठी बाब म्हणजे या बचावकार्यात सहभागी झालेल्या कामगारांना दोन महिन्यांचा बोनसही दिला जाणार आहे. उत्तराखंड सरकार बोगद्यामध्ये अडकलेल्या प्रत्येक कामगाराला एक लाख रुपये, हॉस्पिटलचा खर्च आणि प्रवासभाडे देत आहे.
या प्रेमानेच आपला भारत देश तयार झाला आहे...बोगद्यात अडकलेल्या मजूर बांधवांना सोडवण्याच्या प्रयत्नात जेव्हा मोठ्या मशिन्स कुचकामी ठरल्या तेव्हा रॅट मायनर्सना हाताने बोगदा खोदण्यासाठी बोलावण्यात आले. या कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून अवघ्या २४ तासांत बचावकार्य पूर्ण केले.कामगारांपैकी एक असलेल्या मोहम्मद ईर्शादने प्रत्येकासाठी प्रार्थना केली आहे की, देशात प्रेम टिकून राहावे आणि प्रत्येक व्यक्तीवर माणूस म्हणून प्रेम केले जावे. नासिर हुसेन या दुसऱ्या रॅट होल खाणकाम करणाऱ्या कामगाराने अडकलेल्या कामगारांना दिसताच मिठी मारली, हेच प्रेम आहे. या प्रेमानेच आपला भारत देश तयार झाला आहे. जय हिंद असे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.रॅटमायनर्सना ५० हजारमजुरांचे प्राण वाचवणाऱ्या रॅट खाण कामगारांना सरकारने प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या कामगारांना नवयुग कंपनी दोन महिन्यांचा बोनसही देणार आहे.