मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये बाईकवरून जात असताना एका तरुणाला हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुण आपल्या लहान भावासोबत घरातील साहित्य घेण्यासाठी जात असताना ही घटना घडली. हार्ट अटॅक येताच तो चालत्या बाईकवरून खाली पडला. लोकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
आझाद नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसाखेडी येथील राहुल रायकवार याला हार्ट अटॅक आला. राहुलचे वय 26 वर्षे आहे. शनिवारी राहुल हा त्याच्या लहान भावासोबत घरातील साहित्य घेण्यासाठी जात होता. राहुल बाईकवर मागे बसला होता आणि त्याचा लहान भाऊ बाईक चालवत होता. रस्त्यातच राहुलच्या छातीत अचानक दुखू लागलं. यानंतर तो चालत्या बाईकवरून खाली पडला.
आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने लहान भावाने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं. तपासणीनंतर डॉक्टरांनी राहुलला मृत घोषित केलं. सायलेंट अटॅकमुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. राहुलला दीड वर्षांची मुलगी आहे. राहुल हा इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचा. त्याच्या जाण्याने मुलीच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं आहे. तसेच कुटुंबीयांना देखील धक्का बसला आहे.
हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच कमी वयाच्या लोकांमध्ये हे अनेकदा दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांत शाळा आणि कॉलेजमधील मुलांचा देखील हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. धावपळ, अनहेल्दी फूड, जंक फूड, अनियमित झोप, तणाव ही यामागची मुख्य कारणं असल्याचं म्हटलं जात आहेत.