सिमला : उन्हाळ्यात लोक काश्मीर व हिमाचल प्रदेशात हमखास फिरायला जातात. पण दहशतवाद व सततचे बंद यामुळे हल्ली काश्मीरऐवजी लोकांचा ओढा हिमाचल प्रदेशकडे असतो. मात्र यावर्षी हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या सिमलामध्ये प्रचंड पाणीटंचाई आहे. त्यामुळे पर्यटकांनी कृपया येथे यंदा येऊ नये, अशी विनंती रहिवासी करीत आहेत.पाण्याचा तुटवटा असल्यामुळे सिमलामधील रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानालाही घेराव घातला होता. पाण्यासाठी लोक रोजच्या रोज आंदोलन करीत आहेत. पाण्याचे टँकर आल्यावर सिमल्यातील लोकांची तिथे झुंबड उडत असून, त्यातून भांडणे व मारामाऱ्या होत आहेत. त्यामुळे पाण्याच्या टँकरसोबत पोलिसांच्या गाड्याही फिरताना दिसत आहेत. सिमल्यात दरवर्षी उन्हाळ्यातच नव्हे, तर थंडीतही पाण्याची टंचाई जाणवते. पाणीपुरवठा करण्यासाठीच्या पाइपलाइन ब्रिटिशांच्या काळातील असून, त्यानंतर त्यात सुधारणा करण्यात आल्या नाहीत. सिमल्याची लोकसंख्या मात्र प्रचंड वाढली. त्यामुळे सिमलावासीयांना कायमच पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागते.
अन्यत्र समस्या नाहीयावर्षी पाणीटंचाईचा परिणाम पर्यटनावर जाणवू लागला आहे. हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. पाणीच नसेल, तर आमच्याकडे राहायला पर्यटक येतील तरी कसे, असा सवाल ते विचारत आहेत. दुसरीकडे आम्हाला प्राधान्याने पाणी द्या, हॉटेलांना पाणी द्यायची गरज नाही, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. अर्थात सिमल्यातच ही समस्या असून, हिमाचल प्रदेशातील अन्य ठिकाणी जायला हरकत नाही. तिथे पाणी टंचाई नाही. मात्र कुल्लू, मनाली, धर्मशाला येथे जाणारे पर्यटक आधी येतात सिमल्यातच. त्यामुळे त्या ठिकाणी जाणारे पर्यटक घटण्याचीही भीती आहे.