मुंबई- भारताची बॅडमिंटन क्वीन पी.व्ही सिंधूशी इंडिगोच्या ग्राऊंड स्टाफने असभ्य वर्तन केल्याचं समोर आलं आहे. हैदराबाद-मुंबई विमानात आपल्याला अत्यंत वाईट वागणूक केली असल्याने सिंधूने म्हंटलं आहे. सिंधूने ट्विट करून या बद्दलची माहिती दिली आहे. ट्विटमधून सिंधूने इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याबद्दल नाराजी आणि राग व्यक्त केला आहे.
इंडिगोच्या विमानाने सिंधू हैदराबादवरून मुंबईला येत होती. त्यावेळी हा प्रकार घडला आहे. इंडिगोच्या 6E 608 या विमानाने सिंधू हैदराबादहून मुंबईला येत होती. त्यावेळी अजितेश नावाच्या ग्राऊंड स्टाफने तिच्यासोबत उद्धट वर्तन केलं. सिंधूने संपूर्ण घटनेची माहिती देत अजितेशने अत्यंत वाईट वर्तन केल्याचं म्हंटलं.
विमानात असणाऱ्या आशिमा नावाच्या एअर होस्टेसने सिंधूशी नीट वर्तन करण्याचा सल्लाही दिला. आशिमाने सल्ला दिल्यानंतर अजितेशने तिच्याशीही गैरवर्तन केलं. प्रवाशांची गैरवर्तन करणारी लोक इंडिगोची प्रतिमा मलिन करत असल्याचं सिंधूने म्हंटलं.
सिंधूच्या तक्रारीनंतर इंडिगोने तिच्या ट्विटवर उत्तर देत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यामुद्द्यावर बोलण्याची गरज आहे, असं इंडिगोने ट्विटमध्ये म्हंटलं आहे. फोनवर बोलायला इंडिगोने सिंधूकडे वेळ मागितला आहे.