ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २२ : रिओमध्ये बॅडमिंटन महिला एकेरीचे रौप्यपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू, महिला कुस्तीत कांस्य विजेती साक्षी मलिक तसेच ५२ वर्षांत भारताला पहिल्यांदा जिम्नॅस्टिकमध्ये सन्मान मिळवून देणारी दीपा कर्माकरला भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. या तीन कन्यांवर भारतातून कौतुक आणि बक्षिसांचा वर्षाव होत असतानाच भारत सरकारने त्यांना खेलरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान वाढवला आहे. भारताचा उत्कृष्ट नेमबाज जितू रायलाही भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
साक्षीने यंदा देशाला पहिले पदक मिळवून दिल्याने खेलरत्नची ती सर्वांत मोठी दावेदार बनली. ५२ वर्षांत पहिल्यांदा भारतीय जिम्नॅस्ट म्हणून रिओत उतरलेल्या त्रिपुराच्या २३ वर्षांच्या दीपाने वॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरीसह चौथे स्थान घेतले. तर सिंधूने ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला रौप्य पदक मिळवून दिले. वर्षांत एकापेक्षा अनेक खेळाडूंना खेलरत्न दिले जाऊ शकेल, अशी सरकारने आधीच घोषणा केली होती. त्यामुळे खलरत्नसाठी एका पेक्षा जास्त खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. खेलरत्नसाठी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याचे नाव देखील होते. पण ऑलिम्पिकमुळे त्याची दावेदारी कमकुवत बनली. याशिवाय टिंटू लुका, अनिर्बान लाहिरी, विकास गौडा, मिताली राज आणि दीपिका पल्लीकल हिच्यासह दहा खेळाडूंनी आपापल्या महासंघांकडून अर्ज पाठविले होते.