नवी दिल्ली - देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्म पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसिध्द उद्योजक रजनीकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांच्यासह अन्य तीन मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. अनाथांची माय म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी पुरस्कार स्विकारला. त्यावेळी, राष्ट्रपती कोविंद हे आपल्या खुर्चीवरुन पायऱ्या उतरुन खाली आले.
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पद्म पुरस्कार वितरण सोहळा दोन टप्प्यात आयोजित करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष 2021 च्या पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी, व्यापार व उद्योगाक्षेत्रातील योगदानासाठी ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’ च्या सहसंस्थापिका जसवंतीबेन जमनादास पोपट यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. 1959 मध्ये सात गृहिणींनी आणि 80 रूपयांच्या भांडवलावर गृहउद्योग सुरू केला होता. आज या गृहउद्योगाचा वटवृक्ष निर्माण झालेला आहे.
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या दोन्ही महिलांच्या पुरस्कारावेळी राष्ट्रपती खुर्चीपासून पायऱ्या उतरुन खाली आले आणि पुरस्कार देऊन दोन्ही महाराष्ट्रीयन महिलांचा सन्मान केला. सिंधुताई आणि जसवंतीबेन यांना पायाने चालता येत नाही, त्यामुळे त्यांना व्हील चेअरवरुन पुरस्कारासाठी राजदरबारात नेण्यात आलं होतं. सिंधुताई सपकाळ गेली चार दशके अनाथांच्या आई म्हणून काम करीत आहेत. म्हणुन त्यांना प्रेमाने त्यांची सारी लेकरे ‘माई’ म्हणतात. सपकाळ यांना डॉक्टरेटची उपाधीही मिळालेली आहे.
दरम्यान, दोन्ही टप्प्यातील पुरस्कार समारंभात उपराष्ट्रपती वैंकय्या नायडु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा अन्य केंद्रीय मंत्री तसेच मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात येते.
सिंधुताईंनी लोकमतचाही केला होता उल्लेख
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यावेळी, मी कधी कल्पना केली नाही, असं काही तरी घडलं आहे. मला फक्त जगायचं आणि जगवायचं होतं. एवढाच फक्त माझा उद्देश होता. माझी लेकरं, लोकांनी दिलेला आधार आणि माझ्या कार्याची वेळोवेळी दखल घेत, सहकार्य करीत कामाला सन्मान प्राप्त करून देणाऱ्या ‘लोकमत’ला देखील मी हा ‘पद्मश्री’ समर्पित करत आहे, असे सिंधुताई सपकाळ यांनी म्हटलं होतं.