नवी दिल्ली : सिंगापूर येथे कोरोना विषाणूचा आणखी एक नवा स्ट्रेन आढळला आहे. तो भारतात तिसऱ्या लाटेस कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे तेथील सर्व उड्डाणे बंद करावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राकडे केली आहे.
सिंगापूर येथे आढळलेल्या विषाणूबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याबाबत केजरीवाल यांनी ट्वीट करुन सांगितले, की हा विषाणू भारतात कोरोनाची तिसरी लाट आणू शकतो. तसेच हा विषाणू लहान मुलांसाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे सिंगापूरहून येणारी आणि जाणारी विमानसेवा तत्काळ बंद करावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. नव्या विषाणूचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने लहान मुलांचे लसीकरणही लवकरात लवकर सुरू केले पाहिजे, अशी मागणीही केजरीवाल यांनी केली. दिल्लीला तिसऱ्या लाटेचा धोका असून त्यासाठी तयारी करायला हवी, असे केजरीवाल यांनी मे महिन्याच्या सुरूवातीला म्हटले होते. नव्या स्ट्रेनकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. दोन्ही देशांमध्ये वंदे भारत मिशनअंतर्गत अतिशय कमी उड्डाणे असून सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असल्याचे नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले