गेल्या काही महिन्यांपासून हृदय विकाराच्या घटनांमध्ये देशभरात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. हृदय विकाराच्या झटक्याने अनेकांचे आकस्मिक निधन झाल्याचे समोर आले आहे. अशातच उत्तर प्रदेशात गाणे गात असतानाच एका गायकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवरात्रीच्या कार्यक्रमात निमित्ताने भजन गात असताना गायकाने प्राण सोडले. हृदय विकाराच्या झटक्याने गायकाचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये नवरात्रीच्या कार्यक्रमात भजन गाताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सहारनपूरमध्ये ६० वर्षीय गायक आपल्या गायकांसह भजन गात होते. त्यांनी 'चलो बुलावा आया है...' हे गाणे गायला सुरुवात केली आणि पहिलं गाणं पूर्ण होण्यापूर्वीच ते खाली कोसळले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. पोलिसांनी गायकाला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
नवरात्रीनिमित्त एका मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ६० वर्षीय हरीश मासटा त्यांच्या सहकाऱ्यांसह विविध गाणी गात होते. दरम्यान, त्यांनी'चलो बुलावा आया है...' गाण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिलं कडवे गायले आणि त्यानंतर त्यांचा आवाज हळूहळू कमी झाला. अर्धे भजन गाऊन झाल्यावर ते खाली बसायला गेले तेव्हा खाली पडले. भजन करणाऱ्यांना त्यांच्या हाताला स्पर्श केला तेव्हा त्यांचे हातपाय थंड पडले होते.
गायकाची अवस्था पाहून भाविक त्यांच्या दिशेने धावले आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ही बातमी समजताच गावातील सर्व लोक तिथे जमा झाले. माहिती मिळताच पोलिसही काही वेळातच तिथे आले. यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. गायकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्थानिक आणि पोलिसांचे म्हणणं आहे.