कोलकाता: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ म्हणजेच केके(KK) यांचे कोलकातामध्ये निधन झाले. एका कार्यक्रमात गात असताना केके यांना अस्वस्थ वाटू लागले, यानंतर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनानंतर आता पश्चिम बंगालमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षाने राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर हलगर्जीपणाचा आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. तर, तृणमूल काँग्रेसने भाजपला केकेंच्या मृत्यूवर राजकारण करू नये असे म्हटले आहे.
भाजपचा आरोपभाजपचे प्रदेश प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी राज्य सरकारकडे या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 'कार्यस्थळी सुमारे तीन हजार लोकांची आसनक्षमता होती, मात्र सात हजारांहून अधिक लोक तेथे उपस्थित होते. त्या ठिकाणी प्रचंड गर्दी जमा झाली होती. व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी कोणतीही व्यवस्था नव्हती,' असे ते म्हणाले.
TMC चे उत्तर भाजपच्या आरोपांना टीएमसीचे प्रदेश सरचिटणीस कुणाल घोष यांनी भाजपवर राजकारण केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 'भाजपने गिधाडाच्या राजकारणाला लगाम घातला पाहिजे. या प्रकरणाचे राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी आहे. प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.'
नेमकं काय झालं?मंगळवारी संध्याकाळी दक्षिण कोलकाता येथील गुरुदास कॉलेजच्या एका कार्यक्रमात केके गायनासाठी आले होते. कार्यक्रमादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले. कार्यक्रम आटोपून ते त्यांच्या हॉटेलवर पोहोचले. त्यानंतर त्यांची अस्वस्थता वाढली आणि ते काही वेळातच तो बेशुद्ध पडले. त्यांच्या सहकाऱ्यांनी केके यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.