Haryana Election Congress : हरियाणातील विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. अशा परिस्थितीत, पक्षांतर करणाऱ्या नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर हरियाणा सरकारच्या स्पेशल पब्लिसिटी सेलचे माजी अध्यक्ष आणि हरियाणवी गायक जय भगवान मित्तल उर्फ रॉकी मित्तल यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्यसभा खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. विशेष म्हणजे, पक्षप्रवेशावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यासाठी खास गाणे गायले.
रॉकी मित्तल यांनी राहुल गांधींची माफी मागून पक्षात प्रवेश केला. त्यांनी मंचावर राहुल यांना उद्देशून गाणे गायले आणि भाजपमध्ये असताना केलेल्या सर्व टीकांसाठी माफीही मागितली. या अनोख्या शैलीत काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाचा व्हिडिओ भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "मुझे माफ करना राहुल मेरे भाई...भाजप नेते रॉकी मित्तल यांनी माफी मागत काँग्रेसमध्ये प्रवेश केला."
1 ऑगस्ट रोजी भाजपला सोडचिठ्ठीरॉकी मित्तल यांनी 1 ऑगस्ट रोजी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. निस्वार्थ काम करुनही पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि गेल्या चार वर्षांत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप भाजपवर केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मित्तल म्हणाले की, गेल्या 14 वर्षांत त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी 200 हून अधिक गाणी लिहिली/गायली, तरीही त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.
राहुल गांधींनी माझ्याबद्दल कधीही तक्रार केली नाहीरॉकी मित्तल पुढे म्हणाले, मी काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात गाणी बनवली, पण त्यांनी माझ्याविरोधात कधीही तक्रार केली नाही. आता मला वाटते की, मी काँग्रेस आणि राहुल गांधींविरोधात गाणी बनवून खूप मोठी चूक केली आहे.
2021 मध्ये तुरुंगात टाकले13 मार्च 2021 रोजी 2015 च्या एका प्रकरणात पोलिसांनी रॉकी मित्तल यांना अटक केली होती. कैथलमधील निदर्शनादरम्यान न्यायाधीशांशी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नंतर त्यांची तुरुंगात रवानगी होऊन जामिनावर सुटका करण्यात आली.