केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या ६० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा, राजस्थानसह देशभरातील शेतकरी आंदोलन करत होते. केंद्र सरकारसोबत एकामागून एक अशा चर्चेच्या फेऱ्या झडत होत्या. हाडे कापणारी थंडी, उन वारा यामध्ये हे शेतकरी तिथे ठिय्या देऊन होते. मात्र, २६ जानेवारीला काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या गोंधळामुळे सारे फासेच पलटले आहेत. आता तर सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलनाला वेगळाच ट्विस्ट आला आहे.
दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेनंतर शेतकरी संघटनांमध्ये फूट पहायला मिळत आहे. नोएडाच्या चिल्ला बॉर्डरवर शेतकरी संघटनेने भारतीय किसान युनियन (भानु) यांनी आंदोलन संपविण्याची घोषणा केली. मजदूर किसान युनियनने आंदोलनातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर चिल्ला बॉर्डरवरील बॅरिकेड्स हटविण्यात आले आहेत. चिल्ला बॉर्डरवर असे झालेले असताना आता सिंघू बॉर्डरवर स्थानिकांनीच शेतकऱ्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. सिंघू बॉर्डरवरील स्थानिक रहिवासी आता रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर जो तिरंग्याचा अपमान केला तो चुकीचा आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. स्थानिकांनी लगेचच हायवे रिकामा करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी हायवेवर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी राकेश टिकैतसह अन्य शेतकरी नेत्यांना नोटीसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी शेतकरी नेते युद्धवीर सिंग यांनी हिंसाचारासंदर्भात दिल्ली पोलिसांची माफी मागितली. एवढेच नाही, तर झालेल्या प्रकाराची आपल्यालाही लाज वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. युद्धवीर सिंग गुरुवारी एका खासगी वृत्तवाहीनीवर चर्चेदरम्यान म्हणाले, आंदोलनातून बाहेर पडलेल्या दोन संघटना, या आधीपासूनच संयुक्त किसान मोर्चाचा भाग नव्हत्या. यापूर्वीही या संघटना आंदोलनातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्यांच्या भागातून त्यांच्यावर दबाव वाढल्याने त्या पुन्हा आंदोलनात सहभागी झाल्या.
1 फेब्रुवारी रोजी होणारा संसद मार्च रद्द -शेतकऱ्यांनी 26 जानेवारीला आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण मिळाल्याने शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. या हिंसाचाराचे पडसाद शेतकरी आंदोलनामध्ये उमटले आहेत. ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने 1 फेब्रुवारीला होणारा संसद मार्च रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
20हून अधिक शेतकरी नेत्यांना नोटिस जारी -दिल्ली पोलिसांनी हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 37 जणांना जबाबदार धरले असून एफआयआरदेखील नोंदवला आहे. एवढेच नाही, तर दिल्ली पोलिसांना 20 हून अधिक शेतकरी नेत्यांना नोटिसदेखील पाठविली आहे. यात योगेंद्र यादव, बलदेव सिंग सिरसा आणि राजेवाल यांच्या नावाचाही समावेश आहे. या सर्वांकडून तीन दिवसांच्या आत उत्तर मागविण्यात आले आहे. आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, असा सवाल या नोटिशीच्या माध्यमाने या नेत्यांना करण्यात आला आहे.