अमृतसर: शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी सिंघु बॉर्डरवर एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करुन त्याचा मृतदेह लटकवण्यात आला होता. या घटनेने देशात मोठी खळबळ माजली. दरम्यान, याप्रकरणी आता चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या हत्येप्रकरणी दोन निहंगांना अटक केले तर इतर 2 आरोपींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.
आत्मसमर्पण करण्यापूर्वी दोघांनी डेरामध्ये श्रीगुरु ग्रंथ साहिबसमोर अरदास अर्पण केली. शनिवारी संध्याकाळी, सोनीपत पोलिसांचे एक पथक आत्मसमर्पण केलेल्या निहंगांना घेण्यासाठी रात्री 8.30 च्या सुमारास सिंघू सीमेवरील निहंगांच्या तंबूत पोहोचले आणि सुमारे 45 मिनिटांनी दोघांनाही तेथून नेले. शुक्रवारी सकाळी झालेल्या हत्येप्रकरणी आतापर्यंत एकूण 4 निहंग पोलिसांच्या ताब्यात आहेत. सरबजीत सिंगने शुक्रवारी आत्मसमर्पण केलं होतं तर, शनिवारी नारायण सिंगने अमृतसरमध्ये शरणागती पत्करली तर भगवंत सिंग, गोविंद सिंग यांनी सिंगू सीमेवर कुंडली पोलिसांना आत्मसमर्पण केलं.
दरम्यान, शनिवारी पंजाबच्या तरण तारण जिल्ह्यातील गावात कडक सुरक्षा व्यवस्थेदरम्यान मृत लखबीर सिंगवर कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला. लखबीरच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अर्दाससाठी तेथे कोणताही ग्रंथी उपस्थित नव्हता, किंवा त्याच्या गावी चीमा कलांमधील कोणीही अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हते.