नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्यी सिंघू सीमेवर (Singhu Border) आंदोलन करत असणाऱ्या शेतकरी आंदोलकांची नाचक्की करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आता नवे हातखंडे आजमवण्यास सुरुवात केली आहे. याचं एक भयाण वास्तव समोर आलं आहे. सिंघू सीमेवर दिल्ली पोलिसांनी चार ते पाच फुटांची भिंत उभारण्यात आली आहे. या भिंतीच्या पलिकडे पाच पदरी बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत. हे बॅकिरेट्स जवळपास १.५ किमी इतके दूरवर पसरले आहेत. या बॅरिकेट्समुळे शेतकरी आंदोलकांना दिल्ली जल बोर्डाच्या पाण्याच्या टँकर्सपर्यंत पोहोचता येत नाहीय. इतकंच नव्हे, तर शेतकरी आंदोलकांसाठी ठेवण्यात आलेल्या मोबाइल टॉयलेट्सपर्यंतही पोहोचणं आता कठीण झालं आहे. ( Singhu Border No access to water toilets for farmers)
दिल्ली पोलिसांच्या या वागणुकीमुळे शेतकरी आंदोलकांमध्ये कमालीचा रोष आहे. तरीही आंदोलन थांबणार या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. "आम्ही शेतकरी आहोत. गरज पडली तर बोअरवेल खणून पाणी मिळवू पण आम्ही घाबरुन जाऊ असा सरकारने अजिबात विचार करू नये. जोवर आमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित होत नाही तोवर आम्ही इथून माघारी जाणार नाही", असं शेतकरी आंदोलक कुलजित सिंग म्हणाले.
शेतकरी आंदोलन भाजपला पडणार महागात?; 'या' राज्यातील सरकार सापडलं संकटात
शेतकरी आंदोलकांना आता दैनंदिन स्वच्छतेच्या मुद्द्याशी झगडावं लागतं आहे. बोटावर मोजण्या इतके मोबाइल टॉयलेट आता उपलब्ध असल्यानं शेतकरी आंदोलकांच्या टॉयलेटबाहेर रांगा लागत आहेत. त्यामुळे सध्या अनेकांना खुल्या मैदानातच शौच करावे लागत असून महिला आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखणं हा पोलिसांचा उद्देश नसून दिल्लीकडून मिळणाऱ्या सर्व सुविधांपासून वंचित ठेवण्याचा मनसुबा पोलिसांचा असल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे कार्यकर्ते मनजित ढिल्लन यांनी केला आहे.
बॉर्डरवर पोलीस वाजवतायेत 'संदेशे आते है' गाणं; शेतकरी म्हणाले, बंद करा, आम्हाला त्रास होतोय
"दिल्लीच्या बाजूनं याआधी आमच्यापर्यंत अनेक पाण्याचे टँकर येत होते. पण आता तिथून काहीच येत नाही. हरियाणाच्या बाजूनं आमच्याकडे टँकर येत आहेत. अनेकांना पाणी विकत घ्यावं लागत आहे.", असं ढिल्लन यांना सांगितलं.
दिल्ली पोलिसांकडून शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी फक्त बॅरिकेट्स उभारण्यात आलेले नाहीत. तर बॅरिकेट्ससोबतच मोठे कंटेनर्स ठेवून रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत. या कंटेनर्समध्ये सिमेंटच्या गोण्या भरण्यात आल्यात. दिल्लीच्या दिशेनं एक पाच फुटांची सिमेंटची भिंत उभारण्यात आलीय तर बॅरिकेट्सची भलीमोठी रांगच या भिंती पलिकडे उभारण्यात आली आहे.