प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. काही जण परिस्थितीसमोर हार मानतात. तर काही सर्व अडचणींना खंबीरपणे सामोरे जातात. साहजिकच कष्टाचे फळ नेहमीच गोड असते. नोएडामध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. एका आईची हृदयस्पर्शी गोष्ट समोर आली आहे. दु:खाचा डोंगर कोसळला, पण महिलेने धीर सोडला नाही. घर चालवण्यासाठी ती आपल्या मुलाला कुशीत घेऊन ई-रिक्षा चालवते.
उत्तर प्रदेशातील चंचल शर्माची ही गोष्ट आहे. ती नोएडा (जिल्हा गौतम बुद्ध नगर) च्या रस्त्यावर तिच्या एका वर्षाच्या मुलासह ई-रिक्षा चालवते. पतीपासून ती वेगळी झाली असून ती तिच्या आईसोबत खोडा कॉलनीत राहते. मात्र तिची आई भाजी विकायला गेल्यावर मुलाची काळजी घेणारं घरी कोणी नसतं. यामुळेच ती ई-रिक्षा चालवताना मुलाला आपल्यासोबत घेऊन जाते.
हा प्रवास सोपा नाही...
चंचलच्या मते हे आव्हान सोपे नाही. मात्र घर चालवण्यासाठी तिला हे करावे लागतं. तिने असेही सांगितले की पूर्वी ती मुलाला तिच्या आई किंवा बहिणीकडे सोडायची. पण हे नेहमीच शक्य होत नाही. आता ती महिन्यातून फक्त 2-3 दिवस मुलाला सोडते. तिने उन्हाळ्यात नोएडाच्या रस्त्यावर ई-रिक्षा चालवल्याचेही सांगितले, पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. उष्णतेने मुलाला त्रास व्हायचा त्यामुळे तो रिक्षा चालवताना रडायचा.
दिवसाला 600 ते 700 रुपये कमावते
टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राशी बोलताना चंचलने सांगितले की, ती दिवसाला 600 ते 700 रुपये कमावते. या कमाईपैकी निम्मी रक्कम ई-रिक्षा खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात जाते. तिने सांगितले की ती नेहमी मुलासाठी दुधाची बाटली सोबत ठेवते. सेक्टर 62 मधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल आणि सेक्टर 59 मधील लेबर चौक दरम्यान चंचल तिची ई-रिक्षा चालवते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.