नवी दिल्ली - पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेता प्लास्टिकचा वापर करू नये असं सांगितलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नये असं आवाहन केलं होतं. त्यानंतर अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणं लोकांनी टाळलं आहे. तसेच दुकानदारही ग्राहकांना कापडी पिशव्या वापरण्याचा सल्ला देतात. 2 ऑक्टोबरपासून देशभरात प्लास्टिक बंदी होऊ शकते.
गांधी जयंतीपासून प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कटलरी आणि थर्माकोलपासून बनलेल्या वस्तूंचे उत्पादन बंद करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने तसे प्रयत्न सुरू केले आहेत. प्लास्टिक बंदीसंबंधी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. पर्यावरण मंत्रालयाने या महिन्याच्या सुरुवातीला मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. यामध्ये सरकारी कार्यालये, सार्वजनिक आणि खासगी कंपन्या, कार्यालयांमध्ये प्लास्टिकच्या वस्तू उदा. कृत्रिम फुले, बॅनर, फ्लॅग, फुलदाणी, फ्लोवर पॉट्स, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक स्टेशनरी साहित्य आदींचा वापर करू नये असं म्हटलं आहे.
प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेक ठिकाणी प्लास्टिकबंदी करण्यात आली आहे. पर्यावरणाचे होणारे नुकसान रोखण्यासाठी छत्तीसगडमध्ये काही दिवसांपूर्वी एक अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. प्लास्टिक कचऱ्याच्या मोबदल्यात नागरिकांना मोफत जेवण देण्याचा चांगला उपक्रम राबवण्यात आला होता. त्यानंतर रेल्वेही पाण्याच्या प्लास्टिक बॉटलचा योग्य उपयोग करणार आहे. रेल्वे स्थानकावर फेकण्यात आलेल्या पाण्याच्या रिकाम्या बॉटल्सच्या मदतीने आता टी-शर्ट आणि कॅप तयार करण्यात येत आहे. प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल्सचा अनेकदा रेल्वे स्थानकावर खच पाहायला मिळतो. पिण्याचे पाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्लास्टिकची बॉटल वापरतात. मात्र आता या बॉटल्स क्रश करून त्यापासून टी-शर्ट आणि कॅप तयार करण्यात येणार आहेत.
पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या प्लास्टिकच्या पाण्याच्या रिकाम्या बॉटल्सपासून पूर्व मध्य रेल्वे आता टी-शर्ट तयार करणार आहे. यासाठी रेल्वे स्थानकांवर बॉटल क्रशर मशीन बसवण्यात येणार आहेत. या मशीनच्या मदतीने क्रश झालेल्या प्लास्टिकपासून टी-शर्ट तयार करण्यात येणार आहे. सर्व ऋतुमध्ये हे टी-शर्ट वापरता येणार असून रेल्वेने यासाठी मुंबईच्या एका कंपनीसोबत करार केला आहे. लवकरच प्लास्टिक बॉटलपासून तयार करण्यात आलेले टी-शर्ट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
कचरा द्या अन् पोटभर जेवा; तुम्हालाही वाटेल 'या' अनोख्या कॅफेचा हेवाछत्तीसगडमध्ये भारतातील पहिला Garbage Cafe तयार करण्यात आला आहे. एक किलो प्लास्टिकच्या मोबदल्यात लोकांना मोफत जेवण मिळणार आहे. यामुळे शहर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या अंबिकापूर महानगर पालिकेच्या वतीने गार्बेज कॅफे सुरू करण्यात आला आहे. शहर स्वच्छ व सुंदर राहावे तसेच प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. एक किलो प्लास्टिक गोळा करून आणले तर त्या मोबदल्यात नागरिकांना मोफत जेवण मिळणार आहे. तसेच 500 ग्रॅम प्लास्टिक कचरा आणणाऱ्या लोकांना या कॅफेमध्ये नाष्टा देण्यात येणार आहे. गार्बेज कॅफेमध्ये नागरिकांना मोफत जेवण मिळणार असल्याने सर्वत्र या कॅफेचं कौतुक होत आहे.