नवी दिल्ली : गृहमंत्रालयाने इंटरपोलच्या सेक्रेटरी जनरल या पदासाठी सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांचे नाव निश्चित केले असून, त्याबाबत विदेश मंत्रालयाचे मत मागितले आहे.इंटरपोलमधील या सर्वोच्च पदाच्या स्पर्धेत भारत पहिल्यांदाच सहभागी झाला आहे. सध्या हे पद रोनाल्ड के. नोबेल यांच्याकडे आहे. सीबीआयने या पदासाठी समर्थन मिळविण्यासाठी विदेश मंत्रालयाची मदत मागितली आहे. फ्रान्समधील लियोन येथे इंटरपोलचे मुख्यालय असून, १६ जून रोजी इंटरपोल कार्यकारिणीच्या बैठकीसमोर सिन्हा उपस्थित राहतील. ६१ वर्षीय सिन्हा हे देशातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून युरोपमधील तीन, आफ्रिका आणि अमेरिकेतील प्रत्येकी एका उमेदवारासोबत त्यांच्या नावाचा विचार केला जाईल. इंटरपोलच्या कार्यकारिणीत अमेरिका, कॅनडा, चिली, इटली, नेदरलँड, फिनलँड, जपान, कोरिया, नायजेरिया, अल्जेरिया, रवांडा आणि कतारचा समावेश असून, फ्रान्सचे मिरेली बॅलेस्ट्राझी हे कार्यकारिणीचे अध्यक्ष आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
इंटरपोलप्रमुख पदासाठी सिन्हा चर्चेत
By admin | Published: June 13, 2014 3:31 AM