बहीण खेळायला घेत नाही, मुलाची पोलिसांत तक्रार, पोलिसांनी बहीण, मैत्रिणींची काढली समजूत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 05:37 AM2020-05-15T05:37:20+5:302020-05-15T05:37:52+5:30
केरळमध्ये अशाच एका घरी थांबून त्रासलेल्या, कंटाळलेल्या आठ वर्षांच्या मुलासोबत खेळण्यास त्याच्या मोठ्या बहिणीने व इतर चार मुलींनी नकार दिला व त्याला धक्काबुक्कीही केली.
थिरुवनंतपुरम : कोरोनाच्या उद्रेकानंतर शाळा बंद झाल्या. खेळाची मैदाने ओस पडली. त्यामुळे मुलांना घरी तासन्तास बसून राहण्याचा उबग आला. ते पार कंटाळले. या परिस्थितीत घरी त्यांच्यासोबत खेळायला कोणी नसेल, तर त्यांना एकटे वाटणे अगदी स्वाभाविक
आहे.
केरळमध्ये अशाच एका घरी थांबून त्रासलेल्या, कंटाळलेल्या आठ वर्षांच्या मुलासोबत खेळण्यास त्याच्या मोठ्या बहिणीने व इतर चार मुलींनी नकार दिला व त्याला धक्काबुक्कीही केली. या मुलींना धडा शिकवण्यासाठी व त्यांना अटक व्हावी यासाठी त्याने पोलिसांकडे त्यांची तक्रार करण्याचा निर्णय घेतला. या त्याच्या अनपेक्षित विनंतीने पोलीस अधिकारी स्तंभित झाले हे सांगणे नकोच.
पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला आम्ही उद्या तुझ्या घरी येऊ व तुझा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले. त्याची तक्रार ऐकून घेतल्यावर पोलिसांनी इतर मुलांना बोलावून घेऊन यालाही खेळायला घेत जा, असा सल्ला त्यांना दिला.
‘त्या’ मला चोर-पोलीस खेळू देत नाहीत
उमर निदार या मुलाने पोलिसांना सोमवारी सांगितले की, ‘त्या माझी थट्टा करतात. कारण मी मुलगा आहे. त्या मला त्यांच्यासोबत लुडो, शटल, चोर पोलीस खेळ खेळू देत नाहीत,’
उमर निदारने वडिलांकडे बहीण व इतर मुलींची तक्रार केल्यावर ते थट्टेने म्हणाले की, जा पोलिसांकडे त्यांची तक्रार कर. मग उमर थेट पोलिसांकडे
आला.
उमर लॉकडाऊनमुळे त्याच्या मित्रांशीही खेळू शकत नसल्यामुळे वैतागला होताच. उमर हा तिसºया वर्गाचा विद्यार्थी.
दोन पोलीस अधिकारी दुसºया एका तक्रारीसंदर्भात उमरच्या वस्तीत १० मे रोजी आले असताना त्याने इंग्रजीत लिहिलेली तक्रार त्यांच्या हाती दिली. त्यावेळी बरीच सायंकाळ झाली होती.