वाराणसी - दोन मुली मागील वर्षभरापासून आपल्या आईच्या मृतदेहासोबत घरात राहात असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. वाराणसीतील लंका पोलिसांनी बुधवारी सदर मुलींच्या घरी धडक दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. उषा तिवारी असं ५२ वर्षीय मृत महिलेचं नाव असून पल्लवी तिवारी (वय २७) आणि वैश्विकी तिवारी (वय १८) अशी मृतदेहासोबत राहणाऱ्या मुलींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी आणि वैश्विकी गेल्या अनेक दिवसांपासून घराचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या शेजारील व्यक्तीने याबाबतची माहिती लंका पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर काल लंका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तिवारी कुटुंबीय राहत असलेल्या घरी पोहोचले. यावेळी पोलिसांनाही घराचा दरवाजा बंद असल्याचं आढळलं. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा एका खोलीत उषा तिवारी यांच्या मृतदेहाचा सांगाडा आढळला, तर दुसऱ्या एका खोलीत दोन्ही मुली बसल्या होत्या.
मुलींनी काय माहिती दिली?
आईच्या मृतदेहासोबत राहणाऱ्या पल्लवीचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालं आहे, तर वैश्विकी ही दहावी इयत्तेत शिकत आहे. पोलिसांनी आईच्या मृतदेहाबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की, "मागील वर्षी डिसेंबर महिन्यात आजारपणामुळे आमच्या आईचा मृत्यू झाला होता. मात्र अंत्यसंस्कार करण्यासाठी आमच्याकडे पैसे नसल्याने आम्ही मृतदेह तसाच घरी ठेवला. आमचे वडील मागील दोन वर्षांपासून घरीच आले नाहीत," असा दावा पल्लवी आणि वैश्विकी यांनी केला आहे.
मृतदेहासोबत कशा राहिल्या?
एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर वेळीच अंत्यसंस्कार न केल्यास मृतदेहातून दुर्गंध पसरतो. असं असताना मागील वर्षभरापासून दोन मुली आईच्या मृतदेहासोबत एकाच घरात कशा राहिल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर मुलींनी सांगितले की, आम्ही एका खोलीत हा मृतदेह झाकून ठेवत असायचो आणि झोपण्यासाठी रात्री टेरेसवर जायचो.
दरम्यान, दोन्ही मुली मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच घरात आढळलेला सांगाडा पोलिसांनी ताब्यात घेत पुढील तपासासाठी पाठवला आहे.