Prajwal Revanna : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी कर्नाटक असतानाच तिथल्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. कटकातील हसन लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि जेडीएसचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्या अश्लील व्हिडिओ वादाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि प्रज्वल यांचे काका एचडी कुमारस्वामी यांनी पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटलंय.
खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या सेक्स स्कँडलवरुन कर्नाटकात खळबळ उडाली आहे. कर्नाटक सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केल्यानंतर प्रज्वल रेवन्ना देश सोडून पळून गेल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. शनिवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या मागणीवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. यानंतर प्रज्वल रेवन्ना जर्मनीला रवाना झाले.
जेडीएस खासदार रेवन्ना यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर कर्नाटक सरकारने चौकशी सुरु केली आहे. शनिवारी सिद्धरामय्या यांनी तपासाचे आदेश जारी केले. महत्त्वाची बाब म्हणजे रेवन्ना ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते तिथे शुक्रवारी मतदान पार पडलं. मात्र त्याआधी दोन दिवस हे सगळे अश्लिल व्हिडीओ समोर आले होते.
दुसरीकडे, पूर्णचंद्र तेजस्वी एमजी यांनी या अश्लील व्हिडिओ-फोटोप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नवीन गौडा आणि इतर अनेकांनी प्रज्वल रेवण्णाची बदनामी करण्यासाठी हे अश्लील व्हिडिओ शेअर केल्याचे त्यांनी म्हटले.
पोलिसांत तक्रार दाखल
“नवीन गौडा आणि इतरांनी व्हिडिओ तयार केले आणि हसन लोकसभा मतदारसंघात प्रज्ज्वल रेवन्ना यांची बदनामी करण्यासाठी ते पेन ड्राइव्ह, सीडी आणि व्हॉट्सॲपद्वारे अश्लील व्हिडिओ प्रसारित केले. ते लोकांना प्रज्वलला मत देऊ नका असे सांगत होते,"असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
कोण आहे प्रज्वल रेवन्ना?
33 वर्षीय प्रज्वल रेवन्ना सध्या कर्नाटकातील हसन येथील खासदार आहेत. 2019 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच ही जागा जिंकली होती. यापूर्वी 2004 ते 2019 पर्यंत एचडी देवेगौडा यांनी या जागेवर सलग विजय मिळवला होता. सध्या रेवन्ना हसन या लोकसभा मतदारसंघातून एनडीएचे उमेदवार आहेत.