‘इंडिया’ सत्तेत आल्यास निवडणूक रोखे प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 09:41 AM2024-03-24T09:41:20+5:302024-03-24T09:42:01+5:30
लोकसभा निवडणुका होऊन गेल्यानंतर ही आकडेवारी जाहीर व्हावी, यासाठी बहुधा मोदी सरकारच्या इशाऱ्यानुसारच ‘एसबीआय’ने पावले उचलली असावीत, असा दावा जयराम रमेश यांनी केला.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास निवडणूक रोखे प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. ते म्हणाले की, निवडणूक रोखे हा ‘प्रीपेड लाच’ आणि ‘पोस्टपेड लाच’ असा मामला आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे.
निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे (एसबीआय) सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करण्यात आले. लोकसभा निवडणुका होऊन गेल्यानंतर ही आकडेवारी जाहीर व्हावी, यासाठी बहुधा मोदी सरकारच्या इशाऱ्यानुसारच ‘एसबीआय’ने पावले उचलली असावीत, असा दावा जयराम रमेश यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे ‘एसबीआय’ला निवडणूक रोख्यांचा तपशील गेल्या २१ मार्च रोजी जााहीर करावाच लागला. निवडणूक रोखे हा मोठा घोटाळा आहे, असा आराेप रमेश यांनी केला.
‘काँग्रेस प्रस्थापित कंपनी, तर भाजप स्टार्ट-अप’
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस ही एका प्रस्थापित कंपनीसारखी असून भाजप हा स्टार्ट-अप आहे. प्रस्थापित कंपनीचे बाजार भांडवल कमी-जास्त होत राहते. तशीच काँग्रेसची स्थिती आहे; पण हा पक्ष पुन्हा नक्की सत्तेवर येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळेच भाजपला निवडणुकांत यश मिळत असल्याची गोष्ट जयराम रमेश यांनी अमान्य केली. संघटन सामर्थ्य हे अधिक महत्त्वाचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.