बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील डुमरा ब्लॉकमधील रिकौली येथे मध्यान्ह भोजनामुळे पन्नासहून अधिक मुलं आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलांनी गंभीर आरोप केला आहे की, जेवणात पाल पडली होती आणि त्याबाबत तक्रार करूनही शाळा प्रशासनाने जबरदस्तीने मुलांना अन्न खाऊ घातलं. भयंकर बाब म्हणजे मुलं आजारी पडल्यावर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करण्यात आले नाही.
पालकांना याची माहिती मिळताच सर्वांनी तेथे धाव घेत शाळेचा दरवाजा तोडला. स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. डुमरा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मुलांना रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलीस वाहनातून मुलांना डुमरा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले. आजारी बालकांची संख्या इतकी होती की अनेक बालकांना सदर रुग्णालयात दाखल करावे लागले. वैद्यकीय पथक सतत मुलांची काळजी आणि उपचार करत आहे.
सीतामढी सदर रुग्णालयाच्या उपअधीक्षक सुधा झा यांनी सांगितले की, सर्व मुलांची प्रकृती सामान्य आहे आणि मुलं बरी होत असल्याने त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येत आहे. पालक रोहित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलं जेवल्यानंतर आजारी पडली, तेव्हा शाळा प्रशासनाने गावकऱ्यांना याची माहिती दिली नाही. लोकांना माहिती मिळताच सर्वजण पोहोचले, त्यानंतर गेट तोडून मुलांना रुग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
दुसरीकडे, सीतामढीचे डीएम मनेश कुमार मीना यांच्या सूचनेवरून शिक्षण विभागाचे डीपीओ अमरेंद्र पाठक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सदर रुग्णालयामध्ये पोहोचले आणि प्रकरणाची चौकशी करण्यात आली. अनेक मुलांची चौकशी केली. तेव्हा पाल पडल्याचं सांगितलं. तर ही केवळ अफवा असल्याचं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचं म्हणणे असून, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.