उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात राहणारा एक तरुण शेतकरी लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान बनला आहे. सीतापूरमधील राजीव त्रिपाठी याने LLB, B.ED आणि CA चे शिक्षण घेतल्यानंतर लखनौमध्ये एक इन्कम टॅक्स आणि जीएसटीचं ऑफिस सुरू केलं, परंतु त्याला शहरातील नोकरी आवडत नव्हती. त्यामुळे शेतीकडे वळण्याचा मोठा निर्णय घेतला.
राजीव हा एका प्रगतीशील शेतकऱ्याचं उत्तम उदाहरण आहे, जो फक्त शेतीतून केवळ आपली कमाई वाढवत नाही तर इतरांनाही रोजगार देत आहे. इंडिया टुडेच्या किसान टकशी बोलताना राजीवने सांगितले की, "२०१८ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेती करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांचा सल्ला घेत त्यांनी हंगामानुसार पिके व भाजीपाल्याची लागवड सुरू केली."
"टोमॅटो, केळी, बांबू, हळद, लिंबू, पपई, टरबूज यांची लागवड सुरू केली. रात्रंदिवस मेहनत केल्यामुळे आज आमच्या शेतातील मालाचा पुरवठा उत्तर प्रदेशातील १६ जिल्हे ते सौदी अरेबियापर्यंत केला जात आहे. २३ एकरात विविध पिकं घेतली आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यापारी स्वतः आमच्या शेतात येतात आणि सर्व माल खरेदी करतात."
शेतकऱ्याने पुढे सांगितलं की, आम्ही यंत्रांचा कमी वापर करतो. मजुरांकडून काम करून घेण्यावर आमचा जास्त फोकस आहे. याच कारणामुळे २५ हून अधिक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे, जेणेकरून ते स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतील. ते आमच्याकडेच रोज काम करतात, त्यामुळे त्यांना इतरत्र कामावर जावं लागत नाही.
६ वर्षांच्या मेहनतीमुळे आज राजीव याचा वर्षाला टर्नओव्हर ५५ लाखांच्या वर पोहोचला आहे. आज त्यांना पाहून अनेक शेतकरी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळत आहेत. प्रगतीशील शेतकरी राजीव त्रिपाठी याला आधुनिक शेती आणि उत्तम उत्पादनासाठी KVK द्वारे विविध व्यासपीठांवर अनेकदा सन्मानित करण्यात आलं आहे.