हैदराबाद : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गेले चार दिवस येथे भरलेल्या २२ व्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सीताराम येचुरी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी रविवारी एकमताने फेरनिवड करण्यात आली.माकपच्या मध्यवर्ती समितीतील ९५ नवनियुक्त सदस्यांनी या फेरनिवडीवर शिक्कामोर्तब केले. २०१५ साली विशाखापट्टणम येथे झालेल्या पक्षाच्या याआधीच्या येचुरी यांची पहिल्यांदा पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली होती. त्याआधी या पदावर ज्येष्ठ नेते प्रकाश करात होते. येचुरी यांच्या पहिल्या कारकिर्दीची मुदत संपल्यानंतर त्यांच्या जागी कोणाला नेमावे याबाबत त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार, पॉलिट ब्युरो सदस्य वृंदा करात, चिटणीस बी. व्ही. राघवुलू यांच्यासह आणखी काही नावांची चर्चा झाली. (वृत्तसंस्था)काँग्रेसशी युती नाहीभाजपाशी मुकाबला करण्यासाठी काँग्रेसशी सहकार्य करायचे किंवा नाही, याविषयी माकपमध्ये मतभेद निर्माण झाले होते. या विषयावर हैदराबाद येथील २२व्या काँग्रेसमध्ये शनिवारी मध्यममार्ग स्वीकारण्यात आला. ‘काँग्रेसशी कोणत्याही प्रकारचा समझोता किंवा निवडणूक युती केली जाणार नाही, असा जो माकपच्या धोरणविषयक मसुद्यात उल्लेख होता, त्यात आता ‘माकप काँग्रेसशी कोणतीही राजकीय युती करणार नाही,' अशी दुरुस्ती करण्यात आली आहे. हा सीताराम येचुरी यांनी घेतलेल्या भूमिकेचा एकप्रकारे विजय आहे.
सीताराम येचुरी पुन्हा माकपचे सरचिटणीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 1:14 AM