Sitharaman on Economy: '5 ट्रिलियन इकोनॉमी जोक आहे?' अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची विरोधकांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 09:07 PM2023-02-16T21:07:17+5:302023-02-16T21:07:23+5:30
Nirmala Sitharaman News: 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेची खिल्ली उडवणाऱ्या विरोधकांवर सीतारामन यांनी जोरदार हल्लाबोल केला.
Nirmala Sitharaman On Economy: गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरुन खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेची खिल्ली उडवणाऱ्या विरोधकांवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी जोरदार हल्लाबोल केला. गुरुवारी (16 फेब्रुवारी) हैदराबादमध्ये बोलताना त्या म्हणाल्या की, 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे टार्गेट जोक आहे, असे कसे म्हणता? प्रत्येक राज्याने यामध्ये योगदान दिले पाहिजे. तुम्ही कुणावर हसताय..?
यावेळी निर्मला सीतारामन यांनी तेलंगणा सरकारवरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, तेलंगणचे कर्ज 2014 मध्ये 60,000 कोटी रुपये होते, परंतु गेल्या 7-8 वर्षांत ते 3 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. जेव्हा केंद्राने वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ठिकाणांची यादी मागितली तेव्हा राज्याने (तेलंगणा) करीमनगर आणि खम्ममची यादी केली, परंतु त्या ठिकाणी आधीच वैद्यकीय महाविद्यालये होती.
केंद्रीय अर्थमंत्री पुढे म्हणाल्या की, आता तुम्ही (तेलंगणा सरकार) म्हणत आहात की तुम्हाला केंद्राकडून 157 वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एकही वैद्यकीय महाविद्यालय मिळालेले नाही. तेलंगणातील वैद्यकीय महाविद्यालये असलेल्या ठिकाणांचा डेटा तुमच्याकडे नाही आणि तुम्ही एनडीएकडे डेटा नसल्याचा आरोप करत आहात.
केसीआर यांनी केली होती टीका
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताची 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या लक्ष्याला एक विनोद आणि मूर्खपणा म्हटले होते. केसीआर म्हणाले होते की, 2023-24 पर्यंत भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. हा 5 ट्रिलियन स्वतःच एक विनोद आहे. आपले ध्येय मोठे असले पाहिजे, मोठे स्वप्न पाहण्याचे धाडस केले पाहिजे.