नवी दिल्ली: आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यकाळातच देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती आज वाईट असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं होतं. यावर काँग्रेसच्या काळात मी फक्त 8 महिने आरबीआयचा गव्हर्नर पदी होतो आणि मी भाजपा सरकार असताना 26 महिने आरबीआयचा गव्हर्नर म्हणून कार्यरत होतो. त्यामुळे माझ्या कार्यकाळातील सर्वाधिक कालावधीत केंद्रात भाजपचेच सरकार होतं असं सांगत आरबीआयचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी केलेल्या आरोपावर पलटवार केला आहे.
रघुराम राजन म्हणाले की, बुडीत कर्जाच्या फेऱ्यात अडकलेल्या बँकांना यातून बाहेर काढण्याचे काम मी जेव्हा आरबीआयच्या गव्हर्नर पदी होतो तेव्हाच सुरु झाले व माझा कार्यकाळ संपेपर्यत संपुष्टात आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आर्थिक विकास वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल तर भारताने नव्या स्वरुपाच्या आर्थिक सुधारणा करणं आवश्यक असल्याचे देखील रघुराम राजन यांनी सांगितले आहे.
रघुराम राजन यांच्या कार्यकाळात राजकीय नेत्यांच्या एका फोनवर काही लोकांना कर्ज देण्यात आले होते. या कारणांमुळेच बँकांना आज शिक्षेचा सामना करावा लागत असल्याचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रघुराम राजन यांच्यावर केले होते.