नवी दिल्ली: देशात बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे तीन लाख ८२ हजार ३१५ नवे रुग्ण नोंद झाले तर तीन हजार ७८० रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या आता दोन लाख २६ हजार १८८ तर एकूण रुग्णांची संख्या २,०६,६५,१४८ झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या ३४ लाख ८७ हजार २२९ आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मतदासंघ असलेल्या वाराणसी आणि आसपासच्या भागातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. वाराणासीत पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. हॉस्पिटल्समध्ये बेड्स नाहीत, ऑक्सिजन नाही, अॅम्बुलन्ससुद्धा मिळत नाही. इतकंच नाही तर कोरोना चाचणी करण्यासाठीही आठवडाभर वाट बघावी लागत आहे. गेल्या दहा दिवसात औषधांच्या दुकानांमध्ये व्हिटॅमिन सी, झिंक आणि पॅरासिटमॉलसारख्या साध्या औषधांचाही तुटवडा निर्माण झाल्याने नागरिक चिंतित आहेत.
वाराणासीत आतापर्यंत ७०,६१२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोना संसर्गामुळे ६९० जणांचा मृत्यू झाला आहे. १ एप्रिलनंतर ६०% म्हणजे ४६,२८० रुग्णांची नोंद झाली, यावरूनच परिस्थितीच्या गांभीर्याचा अंदाज बांधता येईल. मात्र अशा संकटाच्या आणि गरजेच्यावेळी आमचे खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत, असा सवाल आता वाराणसीची जनता विचारू लागली आहे.
दरम्यान, देशात २० लाख कोरोना रुग्णांची संख्या ७ ऑगस्ट रोजी, ३० लाख २३ ऑगस्ट रोजी, ५ सप्टेंबर रोजी ४० लाख तर १६ सप्टेंबर रोजी ५० लाख झाली होती. २८ सप्टेंबर रोजी ६० लाख, ११ ऑक्टोबर रोजी ७० लाख, २९ ऑक्टोबर रोजी ८० लाख, २० नोव्हेंबर रोजी ९० लाख आणि १९ डिसेंबर रोजी १ कोटीची संख्या ओलांडली. ४ मे रोजी देशाने दोन कोटी रुग्णसंख्या गाठली.
देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणे अटळ-
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येणे अटळ आहे. मात्र ती केव्हा येणार हे निश्चित सांगता येणार नाही असा दावा केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार व ख्यातनाम शास्त्रज्ञ के. विजयराघवन यांनी म्हटले आहे. के. विजयराघवन यांनी सांगितले की, देशात लसीकरण मोहिमेत देण्यात येत असलेल्या लसी सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूंवर प्रभावी आहेत. मात्र कोरोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी अधिक प्रभावी लसी तयार करणेही आवश्यक आहे. देशात सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांमुळे संसर्गात तसेच रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्याचा देशातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला. ते म्हणाले की, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांबद्दल जगभरातील शास्त्रज्ञ संशोधनाचे निकष पाळून कमी वेळेत औषधे, लसी तयार करण्याच्या प्रयत्नांत आहेत.
कोरोनाविरुद्ध लढ्याची जबाबदारी गडकरींकडे द्या- सुब्रमण्यम स्वामी
कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात असताना भाजपचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनीही कोरोनावरून केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या कोरोना संकट काळात काहीच कामाचे नसून सध्याची कोरोनाची परिस्थिती हातळण्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.