जम्मू : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत मंगळवारी भाजप आणि माकपसह अन्य सदस्यांनी गदारोळ केला, तेव्हा नियंत्रण रेषेवर परिस्थिती वाईट असल्याचे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह यांनी मान्य केले.राजौरीत नियंत्रण रेषेवरील गावांतून येणाºया लोकांना सुरक्षित आश्रय आणि अन्य सुविधा देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. विधानसभेत भाजप सदस्य रविंदर रैना म्हणाले की, नौशेरा मतदारसंघात नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार होत आहे. यामुळे रहिवाशांचे अतिश्य हाल होत आहेत. लोकांना घर सोडून जावे लागत आहे. सीमा भागातील शाळा बंद आहेत. घरांचे नुकसान होत आहे.या परिस्थितीवर तोडगा काय? असा सवाल त्यांनी सरकारला केला. नौशेरा भागातील परिस्थितीचे आकलन करण्यासाठी मंत्र्यांचेपथक पाठविण्याची मागणी त्यांनी केली. माकपचे सदस्य एम.वाय. तारिगामी आणि भाजपच्या सदस्यांनी रैना यांचे समर्थन केले.यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री सिंह म्हणाले की, पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर परिस्थिती बिघडली आहे. लोक येथून पलायन करत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. लोकांना आवश्यक त्या सुविधा देणे आणि नियंत्रण रेषेवरील लोकांची सुरक्षा निश्चित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.गोळीबार सुरूचकाश्मिरात नियंत्रण रेषेजवळ राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. भारतीय सैन्य त्यांना प्रत्युत्तर देत आहे. या चकमकीत कोणत्याही हानीचे वृत्त नाही. राजौरीचे उपायुक्त शाहिद इक्बाल चौधरी यांनी सांगितले की, नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर सकाळी ७ वाजता गोळीबार सुरू असून, पाच गावांना लक्ष्य करुन गोळीबार होत आहे.५ दिवसांत १४ लोकांचा मृत्यूपाकिस्तानकडून जम्मू, कठुआ आणि सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि पुंछ व राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर १८ ते २२ जानेवारी या काळात झालेल्या गोळीबारात ७ नागरिकांसह १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यानंतर अनेक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. या भागातील ३०० पेक्षा अधिक शाळा बंद ठेवल्या आहेत.
काश्मिरात नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बिघडली आहे! उपमुख्यमंत्री निर्मल सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 2:09 AM