ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 6 - भारत आणि चीनमध्ये सध्या सिक्कीम सीमेवरुन वाद सुरु असून दिवसेंदिवस वातावरण चिघळत चाललं आहे. दरम्यान चीनने जर्मनीतील हॅमबर्ग येथे पार पडणा-या जी 20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणारी बैठक रद्द केली आहे. द्विपक्षीय चर्चेसाठी सध्या वातावरण योग्य नसल्याचं सांगत चीनने भेटीसाठी नकार दिला आहे.
भारत आणि चीनमधील वाद संपवण्यामध्ये ही बैठक महत्वाची ठरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यासाठी दोन्ही देशाच्या प्रमुखांमध्ये हॅमबर्ग येथे बैठक होईल असं सांगण्यातही येत होतं. पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग जी20 परिषदेत बातचीत करत सिक्कीम सीमेवर दोन्ही देशाच्या लष्करामध्ये सुरु असलेला वाद संपवतील अशी सुत्रांची माहिती होती.
आणखी वाचा -
हॅमबर्ग येथे शुक्रवारपासून जी 20 परिषदेला सुरुवात होत आहे. त्याधीच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिका-याने सांगितलं आहे की, "राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि नरेंद्र मोदींमध्ये द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी सध्या योग्य वातावरण नाही". भारत वादग्रस्त सीमेवरुन आपले सैनिक मागे हटवत परिस्थिती पुन्हा पुर्ववत करण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा या अधिका-याने व्यक्त केली आहे. शुक्रवारी ब्रिक्स देशांच्या प्रमुखांची बैठक होईल असंही या अधिका-याने यावेळी स्पष्ट केलं. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग सामील होतील. यावेळी त्यांची बैठक होईल का विचारलं असता, वेळ आल्यावर माहिती देण्यात येईल असं सांगितलं.
सिक्किम परिसरातील आपले सैनिक भारताने स्वत:हून मागे घ्यावेत, अन्यथा १९६२ पेक्षाही वाईट अवस्था करू, अशी धमकी चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्राने दिली आहे. तर उद्दामपणे वागणाऱ्या चीनला रोखण्यासाठी भारताबरोबरच अमेरिका व जपान मलबार कवायतीमध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय चीनच्या हिंदी महासागरातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जीसॅट ७ म्हणजेच रुक्मिणी हा उपग्रह सज्ज आहे.
भूतान व सिक्किमच्या भागात आम्ही घुसखोरी केली नसून, आमचे सैन्य आमच्याच भागात आहे आणि तिथे रस्तेबांधणीचे काम करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, असा दावा करीत चीनने भारतावरच घुसखोरीचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे, तर ते सैन्य हटवण्यात यावे, अन्यथा भारताची अवस्था १९६२ पेक्षा वाईट केली जाईल, अशी इशारेवजा धमकी चीनने दिली आहे.
संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी २०१७ चा भारत आणि १९६२ ची परिस्थिती वेगळी होती, असे केलेले विधान चीनला खूपच झोंबले दिसत आहे. त्यातूनच चिनी वृत्तपत्रातून ही धमकी दिल्याचे मानले जात आहे. युद्ध झाल्याश भारतालाच सर्वाधिक नुकसान सोसावं लागेल, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
मोठा युद्धसराव, भारत, अमेरिका व जपान यांच्या संयुक्त कवायती
चीनच्या हिंदी महासागरातील हालचालींमुळे भारत, अमेरिका व जपान यांच्या संयुक्त कवायती मलबार कवायती या नावाने सुरू होत आहेत. चीनच्या विरोधात एकत्रितपणे ताकद दाखवण्याचा हा मार्ग आहे. या त्रिपक्षीय युद्धाभ्यासामध्ये १५ मोठ्या युद्धनौका, दोन पाणबुड्या, अनेक विमाने तसेच टेहळणी करणारी हेलिकॉप्टर्स सहभागी होणार आहेत.
पुढील आठवड्यात हा युद्धाभ्यास सुरू होत आहे. दक्षिण चिनी समुद्रात चीनची मुजोरी वाढत असून, त्याचा त्रास जपानलाही होत आहे. त्या भागावरही चीन ताबा सांगत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाहतुकीतही अडथळे येत असल्याने चीनने ते थांबवावेत, असा अमेरिकेचा आग्रह आहे. अमेरिकेच्या गस्ती नौकांनाही चीनचा त्रास होत आहे.
तर सिक्कीमच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊ - चीनची उघड धमकी
जर भूतानला मध्ये ओढाल तर आम्ही सिक्कीमच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देऊ अशी धमकी चीनने भारताला दिली आहे. चिनी सरकारच्या मालकिच्या प्रसारमाध्यमांमध्ये हिमालयामधील देशांना भारताने आपल्या मागे ओढू नये असा सूर उमटला आहे. संपादकीयामध्ये भारताने भूतान आणि अन्य देशांना आपल्या बाजुने ओढण्याचा प्रयत्न केल्यास चीन सिक्कीमच्या स्वातंत्र्यांच्या मागणीला पाठिंबा देईल असे म्हटले आहे.
भारत सीमाभागामध्ये आगळिक करत असून त्याची भारी किंमत भारताला मोजावी लागेल अशी दर्पोक्तीही चीनने केली आहे. चीनमधील सरकारी मालकिच्या प्रसारमाध्यमांमध्ये उमटलेला सूर हा चिनी सरकारची अधिकृत भूमिका मानण्यात येते. या पार्श्वभूमीवर सिक्कीम सीमेवर भारत चीनमध्ये असलेला वाद चिघळत असल्याचे दिसून येत आहे. सिक्कीममधील जनतेने याआधी 1960 व 1970 मध्ये स्वतंत्र होण्यासाठी आंदोलने केली परंतु ती निर्दयीपणे चिरडण्यात आल्याचा हास्यास्पद दावाही चीनने केला आहे. भारताने 1975 मध्ये सिक्कीमच्या राजाला पदच्यूत केले आणि सिक्कीमला भारतात जोडले असा दाखला संपादकीयात देण्यात आला आहे.