Bangladesh Violence : अनेक दिवस बांग्लादेशात चाललेल्या आरक्षणविरोधी आंदोलनामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन करावे लागले. सध्या देशात अंतरिम सरकार स्थापन झाले असून, उद्या नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली या अंतरिम सरकारचा शपथविधी होणार आहे. पण, बांग्लादेशातील परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. हिंसक आंदोलनांमुळे अनेकांना देश सोडावा लागत असून, जत्थेच्या जत्थे भारतात येण्याचा प्रयत्न करत आहेत.
भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्नआज दुपारी हजारो बांग्लादेशींनी पश्चिम बंगालच्या सीमेत घुसखोरीचा प्रयत्न केला, पण बीएसएफने त्या सर्वांना रोखले. भारत सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे, तसेच सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बांग्लादेशी नागरिकांचा मोठा गट आज उत्तर बंगालच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर वेगवेगळ्या ठिकाणी जमला होता. हे सर्व भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण, बॉर्डर गार्ड बांग्लादेश, नागरी प्रशासन आणि बीएसएफच्या जवानांनी या सर्वांना पळवून लावले.
भारत-बांगलादेश सीमेवर 'हाय अलर्ट'बीएसएफच्या म्हणण्यानुसार, बांग्लादेशातील घडामोडी लक्षात घेता सोमवारी 4,096 किमी लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवरील सर्व युनिट्समध्ये 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. सुमारे 2200 किलोमीटर लांबीची सीमा एकट्या पश्चिम बंगाल राज्याला लागून आहे. याशिवाय बांग्लादेशची सीमा भारताच्या आसाम, त्रिपुरा, मिझोराम आणि मेघालयशीही आहे. अशा स्थितीत सीमेवर सुरक्षा वाढवणे आणि घुसखोरीचे प्रयत्न थांबवणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
हिमंता बिस्वा सरमा यांनी चिंता व्यक्त केलीआसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बांग्लादेशातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. तसेच, जर बांग्लादेशात अशीच अशांतता कायम राहिली, तर अनेकजण भारतात येतील. शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात ईशान्येतील सर्व दहशतवादी गटांचा बांग्लादेशातून खात्मा करण्यात आला, मात्र आता बांग्लादेश पुन्हा एकदा अशा दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनू शकते, ही आपल्यासाठी चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.