Rajkot maternity Ward CCTV Hacking:गुजरातच्या राजकोटमधील एका महिला रुग्णालयातील खासगी व्हिडिओ लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सायबर क्राईम पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून त्यांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणा हॅक करून व्हिडिओ काढून टेलिग्रामवर विकल्याचा आरोप आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही नेटवर्क हॅक करून महिला रुग्णांचे व्हिडिओ काढून त्यांची ऑनलाइन विक्री केल्याप्रकरणी रविवारी महाराष्ट्रातील सांगलीतून दोन आणि सुरतमधून एकाला अटक करण्यात आली आहे. नीट परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थी असलेल्या आरोपींनी हा सगळा प्रकार केला असल्याचे समोर आलं असून या प्रकरणात महाराष्ट्रातील चार तरुणांना अटक झाली आहे.
राजकोटमधील पायल मॅटर्निटी रुग्णालयाच्या लेबर रुममधील महिला रुग्णांचे व्हिडिओ टेलिग्राम आणि यूट्यूबवर अपलोड केल्याप्रकरणी यापूर्वी लातूर येथील प्रज्वल तैली, सांगली येथील प्राज पाटील आणि उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील चंद्रप्रकाश फुलचंद यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी वैभव बंडू माने, रायन रॉबिन परेरा आणि परीट धनश्यामभाई धामेलिया यांना अटक करण्यात आली. परीट धामेलिया सुरतचा रहिवासी असून इतरदोघे आरोपी महाराष्ट्रातील आहे. परीट ढमेलियाने पायल हॉस्पिटलचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केले होते. रायन परेरा याने रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करून त्याच्या टेलिग्राम आयडीवर व्हिडिओ अपलोड केले होते. तर वैभव बंडू माने हा प्रज्वल तेलीचा भागीदार असून टेलिग्राम चॅनेलचे मार्केटिंग करत होता.
शाळा, कॉलेजमधील सीसीटीव्ही केले हॅक
"आरोपींनी हॅकिंग टूल्सचा वापर केला आणि नऊ महिन्यांत किमान ५०,००० व्हिडिओ काढले, ज्यामध्ये शाळा, कारखाने, महाविद्यालये, कॉर्पोरेट हाऊस आणि अगदी बेडरूममधील फुटेजचा समावेश होता. धमेलियाने रुग्णालयाच्या सीसीटीव्ही सिस्टीममध्ये घुसण्यासाठी तीन वेगवेगळ्या सॉफ्टवेअर प्रोग्रामचा वापर केला होता. त्याने आयपी अॅड्रेस आणि पोर्ट वापरून सिस्टममध्ये प्रवेश मिळवला, ज्यामुळे लाईव्ह सिक्युरिटी फुटेजवर नियंत्रण मिळाले," अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली.
महाराष्ट्रातल्या तरुणांचा सहभाग
परीट धामेलिया हा सुरतचा बीकॉम पदवीधर आहे आणि त्याने सीसीटीव्ही हॅकिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. तर वैभव माने हा संगणक विज्ञान विषयात बीटेक करत असून तो टेलिग्रामवर लीक झालेल्या फुटेजचे मार्केटिंग सांभाळत होता. तर रायन परेरा वसई येथील मॅनेजमेंट स्टडीजचा विद्यार्थी असून त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ विकले होते.
२० टेलिग्राम आयडीवरुन सुरु होता व्यापार
सरकारी वकील जयेश यादव यांनी सांगितले की, आरोपींनी राजकोटच्या पायल हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही सिस्टममध्ये प्रवेश मिळवला होता. तसेच आरोपी गेल्या वर्षभरापासून विविध टेलिग्राम ग्रुपमध्ये अश्लील व्हिडिओ शेअर करत होते. आरोपींनी अंदाजे २० टेलिग्राम आयडी तयार केले होते, ज्यांचा तपास सुरु आहे. व्हिडिओ विकून पैसा कमावला जात होता.