नवी दिल्ली : पुढील वर्षी १ ऑक्टोबरपासून कारमध्ये ६ एअर बॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. काही दिवसांपूर्वी टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूमुळे कारमधील एअर बॅग व सीट बेल्टचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता, असे चौकशीत आढळून आले.
सध्या अनेक कारमध्ये मागे बसणाऱ्यांसाठी एअर बॅग सुविधा नाही. अपघाताप्रसंगी या प्रवाशांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता असते. रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक कारमध्ये ६ एअर बॅग अनिवार्य करण्यात येतील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
एक हजार रु. दंड
- आता केवळ चालक व समोर बसलेल्याला नव्हे, तर मागे बसणाऱ्या प्रवाशांनासुद्धा सीट बेल्ट लावणे अनिवार्य केले आहे.
- या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला किमान १ हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद केंद्र सरकारने केली आहे.
- या तरतुदीची अंमलबजावणी राज्य सरकारने तातडीने करावी, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सुचविले आहे.