सुरेश डुग्गर, ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १७ जवान शहीद झाल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. कुठल्याही परिस्थितील पाकिस्तानला आता धडा शिकवाच अशी देशवासियांची भावना असून, मोदी सरकारवरील दबाव वाढला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानवर कारवाई करण्याचे भारतासमोर काय-काय पर्याय उपलब्ध आहेत.
१) पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्र हल्ल्याव्दारे नष्ट करण्याचा पर्याय आहे. यासाठी पृथ्वी-ब्राम्होस या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राचा उपयोग करता येईल तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मिराज, सुखोई या लढाऊ विमानांव्दारे हवाई हल्ला करता येऊ शकतो. पण या पर्यायांच अवलंब केल्यास दोन्ही देशांमध्ये मोठया युद्धाला तोंड फुटेल.
आणखी वाचा
२) जून २०१५ मध्ये मणिपूरमध्ये अतिरेकी हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्कराने तातडीने कमांडो कारवाईव्दारे प्रत्युत्तर दिले होते. भारतीय कमांडोजनी म्यानमारमध्ये जाऊन अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी या पर्यायाचाही वापर होऊ शकतो. भारतीय कमांडोंना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवून दहशतवादी तळ नष्ट करता येतील पण या पर्यायाचा वापर करतानाही सैन्याने पाकिस्तानी हद्द ओलांडल्यास युद्धाला तोंड फुटेल.
३) दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला संपूर्ण जगात एकाकी पाडण्याचा पर्याय आहे. भारत अनेक दशकापासून याचा पर्यायाचा वापर करत आला आहे. पण त्याने फार काही साध्य झालेले नाही. भारतीय भूमीवरील पाकिस्तानचे हल्ले थांबलेले नाहीत.
४) पाकिस्तानातील निवडून आलेल्या सरकारबरोबर व्दिपक्षीय चर्चेचा पर्याय आहे. पण मोदी सरकारने आधीच दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्दिपक्षीय चर्चा होऊ शकत नाही.
५) पाकिस्तान ज्या प्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये हस्तक्षेप करत आहे. भारताने त्याप्रमाणे बलुचिस्तानचा मुद्दा अधिक प्रभावीपणे लावून धरावा. त्यामुळे पाकिस्तानची जम्मू-काश्मीर संदर्भातील रणनिती कमकुवत होईल.
६) संसदेवर २००१ मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी सीमेवर मोठया प्रमाणावर सैन्य आणून ठेवले होते. पाकिस्तानातून भारतीय हद्दीत नागरी विमान सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पाकिस्तानातून भारतीय उच्चायुक्तांना माघारी बोलवून घेतले होते. सर्व संबंध तोडून टाकले होते. या पर्यायाचा सुद्धा मोदी वापर करु शकतात.