ठळक मुद्देबसपाच्या प्रमुख मायावती यांना राजस्थानमधील त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी धक्का दिलाराजस्थान विधानसभेतील बसपाच्या सहा आमदारांचा पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश बसपा आमदारांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे राजस्थानमधील अशोक गहलोत सरकार स्थिर
नवी दिल्ली - बसपाच्या प्रमुख मायावती यांना राजस्थानमधील त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी धक्का दिला आहे. राजस्थान विधानसभेतील बसपाच्या सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राजस्थान विधानसभेतील बसपाच्या गटाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण झाले आहे. राजस्थानमध्ये बसपाचे आमदार आतापर्यंत अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा देत होते. मात्र आता आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, असे बसपाच्या एका आमदाराने सांगितले.
काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले बसपा आमदार जोगेंद्र सिंह अवाना यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, ''बसपाच्या राजस्थान विधानसभेतील सर्व सहा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. इथे आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे आम्ही काँग्रेस सरकारला पाठिंबा देत होतो, तर दुसरीकडे आम्ही त्यांच्याच विरोधात लढत होतो. त्यामुळे आम्ही आमच्या क्षेत्रातील विकासाचा विचार करून, मतदारांच्या हिताचा विचार करून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे."
बसपाच्या सर्व सहा आमदारांनी राजस्थान विधानसभा अध्यक्षांना यासंदर्भातील एक पत्र पाठवले आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी त्याला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र गुढा( उदयपुरवाटी), जोगेंद्र सिंह अवाना (नदबई), वाजिब अली (नगर), लाखन सिंह मीणा (करोली) संदीप यादव (तिजारा) आणि दीपचंद खेरिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, बसपा आमदारांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे राजस्थानमधील अशोक गहलोत सरकार स्थिर झाले आहे. बसपाचे हे आमदार सतत्याने मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या संपर्कात होते, असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. सध्या 200 सदस्य असलेल्या राजस्थान विधानसभेमध्ये काँग्रेसचे 100 आमदार आहेत. तर त्याचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकदल पक्षाकडे 1 आमदार आहे. तर 13 अपक्ष आमदारांपैकी 12 आमदारांनी पक्षाला बाहेरून पाठिंबा दिलेला आहे.