हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या ४ ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एका जागेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेस पक्षातील सहा नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, गुलाम नबी आझाद, मिलिंद देवरा, उत्तमसिंह पवार, अनंत गाडगीळ यांचा समावेश आहे. काँग्रेसचेराज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. महाराष्ट्र व अन्य राज्यांतील राज्यसभा जागा जिंकाव्या, असे प्रयत्न भाजपनेही सुरू केले आहेत.
गुलाम नबी आझाद यांना महाराष्ट्र किंवा तामिळनाडूमधून राज्यसभेवर पाठवले जाईल, असे आश्वासन त्यांना याआधीच काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मिलिंद देवरा तसेच अनंत गाडगीळ हेही राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. माजी खासदार असलेले उत्तमसिंह पवार हे ओबीसींच्या हक्कांसाठी लढत असतात. काँग्रेसमधील २३ नाराज नेत्यांमध्ये मुकुल वासनिक यांचा समावेश होतो. पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. तामिळनाडूतील राज्यसभेची अतिरिक्त जागा आपल्याला मिळावी, याकरिता काँग्रेस पक्ष द्रमुक नेते व मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याकडे पाठपुरावा करत आहे. पुडुचेरीमधील राज्यसभेची जागा आपल्याला द्यावी, असा आग्रह भाजपने एनआर काँग्रेसचे अध्यक्ष व मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांच्याकडे धरला आहे. आसामध्ये भाजप राज्यसभेची जागा जिंकण्याची शक्यता आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंट या प्रादेशिक पक्षाचे राज्यसभा सदस्य विश्वजित दैमारी यांना खासदारकीचा राजीनामा द्यायला लावून भाजपने त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्यास राजी केले होते. थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे मध्य प्रदेशमधील राज्यसभेची एक जागा रिक्त झाली.
बंगालची जागा तृणमूल जिंकण्याची शक्यता
पश्चिम बंगालमधील राज्यसभेची जागा तृणमूल काँग्रेस जिंकण्याची शक्यता आहे. तामिळनाडूतील दोन जागा काँग्रेस-द्रमुक युती जिंकण्याची शक्यता अधिक आहे. के. पी. मुन्नास्वामी, आर वेतीलिंगम या द्रमुकच्या दोन राज्यसभा खासदारांनी राजीनामा दिला व विधानसभा निवडणूक लढविली. मात्र, त्यात ते पराभूत झाले.