नवी दिल्ली, दि. 3 - मनी लॉंड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आलेला फुटीरवादी आणि हुर्रियत नेता शब्बीर शाहच्या कोठडीत सहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील पटियाला हाउस कोर्टाने शब्बीर शाहला सहा दिवसांची सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत रवानगी केली आहे. मनी लॉंड्रिंगप्रकरणी फुटीरवादी आणि हुर्रियत नेता शब्बीर शाह याला 25 जुलै रोजी पोलिसांनी श्रीनगरमधून अटक केली. त्यानंतर दिल्लीतील पटियाला हाउस कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्याची सात दिवसांची सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत रवानगी केली होती. मात्र, आज त्याला पुन्हा पटियाला हाउस कोर्टात हजर केले असता, त्याच्या कोठडीत पुन्हा सहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे. फुटीरवादी आणि हुर्रियत नेता शब्बीर शाहला सक्तवसुली संचालनालयाने अनेकदा समन्स पाठवले होते. तरीही तो सक्तवसुली संचालनालयासमोर हजर राहिला नाही. अखेर त्याच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले होते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने सात फुटीरवादी नेत्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये फुटीवरवादी नेते गिलानी यांच्या जावयाचाही समावेश आहे. या सर्वांवर काश्मीरमधील दहशतवादी संघटनांनी फंडिंग केल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अलताफ शाह, अयाझ अकबर, पीर सैफुल्लाह, मेहराज, शाहिद-उल-इस्लाम, नईम खान आणि बिट्टा यांचा समावेश आहे. याचबरोबर, राष्ट्रीय तपास यंत्रणेने गेल्याच महिन्यात अलताफ शाह यांच्या घरावर धाड टाकली होती. यावेळी शाहिद-उल-इस्लाम यांच्याही परिसरात झडती घेण्यात आली होती. शाहिद-उल-इस्लाम हा हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख मिरवेज उमर फारुख यांचा साथीदार आहे. अलताफ शाह गिलानी यांचा जावई असून तेहरिक-ए-हुर्रियतसाठीही तो काम करतो. धोरणं विकसित करुन त्यांची अंमलबजावणी करण्यामध्ये त्याचा महत्वाचा सहभाग असतो. फुटीवरवादी संघटनांना मिळणारा निधी खो-यात विध्वंसक गोष्टी आणि दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असून त्यावर पुर्णपणे बंदी आणण्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा प्रयत्न आहे.