इंदौर - महू येथील उद्योजक आणि बांधकाम व्यवसायिक पुनीत अग्रवाल आपल्या कुटुंसासह 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्यासाठी पाताळपानी येथील फार्म हाऊसवर गेले होते. मात्र, 31 डिसेंबरची सांयकाळ अग्रवाल कुटुंबासाठी काळरात्र ठरली. वर्षाअखेरची पार्टी करण्यापूर्वीच पुतीन अग्रवालसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. फार्म हाऊमधील लिफ्ट तुटल्याने झालेल्या अपघातात या सर्वांना जीव गमावावा लागला. या घटनेनं महूसह इंदौरमध्ये शोककळा पसरली आहे.
पुनीत अग्रवाल हे पत्नी, मुलगी, जावई, नातू आणि मुंबईत राहणाऱ्या तीन नातेवाईकांसह नव वर्षाच्या स्वागताची पार्टी करायला आपल्या फार्महाऊसवर गेले होते. येथे बनलेल्या टॉवरवर बसवलेल्या कॅप्सूल लिफ्टने सर्व खाली उतरत असताना लिफ्ट 70 फूट ऊंचीवरून खाली कोसळली. त्यामुळे लिफ्टमधून सर्वचजण खाली फेकले गेले. या दुर्घटनेत 53 वर्षीय उद्योगपती पुनीत, 27 वर्षीय मुलगी पलक, 28 वर्षीय जावई पलकेश अग्रवाल, 3 वर्षीय नातू नव, मुंबईत राहणारे पलकेश यांचे 40 वर्षीय मेहुणे गौरव आणि 11 वर्षीय मुलगा आर्यवीर या सहा जणांचा मृत्यू झाला. तर गौरव यांची पत्नी निधी गंभीर जखमी आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांला ही दुर्दैवी घटना घडली. त्यांनंतर महू गावावर शोककळा पसरली. या अपघाताची माहिती मिळताच, अग्रवाल यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
अग्रवाल कुटुंबीयांच्या निधनामुळे महू शहर बंद ठेवण्यात आले असून आज मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अग्रवाल हे समाजेसेवचंही काम करत, गरजुंच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच, त्यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महूवर शोककळा पसरली आहे.