इंदूर : आठ राज्यांमध्ये हजारो कि.मी. लांबीच्या महामार्गांचे बांधकाम करणाऱ्या ‘प्रकाश अॅस्फाल्टिंग्ज अॅण्ड टोल हायवे (पाथ इंडिया)चे व्यवस्थापकीय संचालक व उद्योजक पुनीत अग्रवाल कुटुंब व मित्र परिवारातील पाच जणांसह मंगळवारी रात्री त्यांच्याच फार्महाऊसवर लिफ्ट कोसळून ठार झाले.अग्रवाल यांच्या पाताळपाणी येथील फार्महाऊसवर हा अपघात झाला. त्यात पुनीत अग्रवाल (५३ वर्षे), मुलगी पलक, जावई पलकेश अग्रवाल, नातू नव आणि पलकेश यांचे मुंबईतील मेव्हणे गौरव आणि त्यांचा मुलगा अर्यवीर यांचे निधन झाले. गौरव यांची पत्नी निधी यांची अनेक हाडे मोडल्याने प्रकृती गंभीर आहे.पुनीत अग्रवाल व त्यांचे मित्र ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्टीसाठी फार्महाऊसवर सहकुटुंब आले होते. परिसरातील निसर्गसौंदर्य उंचावरून पाहता यावे, यासाठी अग्रवाल यांनी परिसरात टॉवर उभारला आहे. ‘कॅप्स्यूल’ लिफ्टने वरच्या प्रेक्षक गॅलरीत जाता येते.अपघात पाहिलेल्यांनी सांगितले की, संध्याकाळी पुनीत अग्रवाल यांच्यासह सात जण लिफ्टने वर गेले. नंतर खाली निघाले. लिफ्टची क्षमता नसल्याने पुनीत यांचा मुलगा निपुण वरच थांबला. सहा जणांना घेऊन लिफ्ट टॉवरवरून खाली येत असता लिफ्टच्या तळाचा पत्रा निखळला व सर्व जण सुमारे ७० फूट उंचीवरून खाली कोसळले.पुनीत यांची पत्नीही सोबत गेली होती. मात्र, ती वर न जाता ते सर्व जण परत येण्याची वाट पाहत खालीच होती. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी व अनेक मान्यवरांनी अग्रवाल कुटुंबावर मृत्यूने घातलेल्या या आकस्मिक घाल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. (वृत्तसंस्था)एकाच चितेवर अंत्यसंस्कारबुधवारी महूजवळील मुक्तिधाम स्मशानभूमीत पुनीत अग्रवाल व नातू यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. अंत्ययात्रेत आप्त, मित्र व नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी होते. मुक्तिधाम स्मशानभूमी नव्याने बांधण्याचे काम अग्रवाल यांचीच कंपनी करीत आहे. पुनीत यांची कन्या व जावई यांच्यावर इंदूर येथे अंत्यसंस्कार झाले, तर गौरव व आर्यवीर यांचे पार्थिव मुंबईला नेण्यात आले.
उद्योजक पुनीत अग्रवाल यांच्यासह सहा ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 2:37 AM