ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 16 - उत्तर प्रदेशमधल्या लखनऊमधील किंग जार्ज चिकित्सा विद्यापीठा(केजीएमयू)च्या ट्रॉमा सेंटरमध्ये काल संध्याकाळी भीषण आग लागली. त्याच वेळी ट्रॉमा सेंटरमध्ये 400हून अधिक रुग्ण उपचार घेत होते. एसीत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. दुस-या मजल्यावर अॅडवान्स ट्रामा लाइफ सपोर्ट(एटीएलएस) वॉर्डमध्ये अचानक लागलेल्या आगीनं काही क्षणांत रौद्ररूप धारण केलं. तिस-या मजल्यापर्यंत पसरल्यानंतर या आगीनं मेडिसिन स्टोरलाही विळख्यात घेतले. आगीच्या दुर्घटनेत हेमंत कुमार, वसीम आणि अरविंद कुमारसहीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जण गंभीररीत्या जखमी आहेत. अनेक रुग्णांच्या हालाला पारावार राहिला नाहीये. मात्र आगीत होरपळून कोणाचाही मृत्यू झाला नाही. चारही बाजूला पसरलेला धूर आणि भीषण आगीच्या भीतीपायी ऑपरेशन थिएटरमधून शस्त्रक्रियेदरम्यानच रुग्ण पळून गेले. त्यानंतर वॉर्डबॉयनं स्ट्रेचरच्या सहाय्यानं रुग्णांना खाली आणलं. ट्रॉमा सेंटरच्या बाहेर रस्त्यावर स्टेचरवरील रुग्णांची रांगच रांग दिसत होती. त्यानंतर रुग्णांना लॉरी कार्डियोलॉजी, शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ट्रॉमा सेंटरमधील रुग्ण इतरत्र हलवल्यामुळे अनेक रुग्णालयांत बेड फूल झाले आहेत. काल संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत अग्निशामक दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या. अखेर मध्यरात्रीच्या सुमारात आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. आग विझवण्यासाठी मध्यरात्री 10 अग्निशामक दलाच्या गाड्या, 45 अग्निशामक जवान दाखल झाले होते. त्यांनीच आगीवर नियंत्रण मिळवलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ट्रॉमा सेंटरमधल्या दुस-या मजल्यावर असलेल्या प्लॅस्टिकच्या सामानामुळे ही आग पसरल्याचं बोललं जातं आहे.