Kerala Malappuram Boat Accident: केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील तनूर भागात पर्यटकांची एक बोट उलटल्याची माहिती मिळाली आहे. बोट उलटल्याने झालेल्या अपघातात सुमारे १५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीत सुमारे ४० जण प्रवास करत होते. अचानक बोट उलटून सुरुवातीला ६ जण बुडाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, यानंतर मृतांचा आकडा वाढून १५ वर गेल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्याचे मंत्री अब्दुरहिमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलप्पुरम जिल्ह्यातील तनूर भागात बोट उलटल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. १० जणांना बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार, सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे जवान तसेच स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. मात्र, रात्रीच्या वेळी हा अपघात घडल्याने मदतकार्यात अडथळे येत आहे. टॉर्चच्या सहाय्याने बुडालेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. बोट ज्या ठिकाणी उलटली, त्या ठिकाणाहून जखमींना किनाऱ्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त
केरळ येथे झालेल्या बोट दुर्घटनेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. मृतांप्रति शोक व्यक्त केला. तसेच या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाइकांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून २ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, अशी घोषणा केली.