चिकोडी : नदीकाठी जुगार खेळत असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यावेळी घाबरून बोटीतून पसार होताना बुडून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील जुने बळोतीनजीक कृष्णा काठावर घडली.कोल्हार शहरातील रहिवासी महबूब वालीकार (वय ३०), तयब चौधरी (४२), रफिक जालगार ऊर्फ बांदे (५५), पुंडलिक मल्लाप्पा यंकंची (३६), दशरथ गौडर सूळीभावी (६६) अशी मृतांची नावे आहेत. बोटीतील सचिन कटबर व बशीर होनवाड या दोघांना पोहता येत असल्याने पोहत नदीकाठावर सुरक्षितपणे पोहोचल्याने या दोघांचा जीव वाचला आहे.याबद्दल अधिक माहिती अशी की, सुमारे आठ जणांचा गट नदीकाठावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोल्हार पोलिस स्थानकाच्या पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांना पाहून घाबरलेल्या सहा जणांनी पोलिसांना चुकविण्यासाठी नदीकाठावर असलेल्या पारंपरिक गोलाकार बोटीत बसून पळ काढला. मात्र, नदीत काही अंतरावर गेल्यानंतर पाण्याच्या भोवऱ्यात अडकून बोट पाण्यात उलटली.पोहता येत नसल्याने यातील सहा जण पाण्यात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली. तर बोटीतील दोघे जण पोहता येत असल्याने बचावले. साखर मंत्री व शिवानंद पाटील घटनास्थळी भेट देऊन म्हणाले, ही घटना दुर्दैवी असून, सरकारकडून भरपाई मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल.
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; घाबरून नदीकाठावरील बोटीतून पळ काढला, अन्..; विजापूर जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 3:23 PM