तिरुपूर : उच्च जातीतील मुलीशी प्रेमविवाह केल्याबद्दल व्ही. शंकर या २२ वर्षांच्या दलित युवकाचा खून केल्याबद्दल तामिळनाडूमधील तिरुपूर जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी सहा आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. अशा प्रकारच्या ‘आॅनर किलिंग’च्या खटल्यात देशात आजवर दिलेली ही सर्वात कडक शिक्षा मानली जात आहे.व्ही. शंकर याने जिच्याशी लग्न केले होते, त्या कौसल्याच्या आई-वडिलांसह एकूण ११ आरोपींवर खुनासह दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये खटला चालला होता. प्रधान सत्र न्यायाधीश अलामेलू नटराजन यांनी कौसल्याचे वडील चिन्नास्वामी यांच्यासह सहा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. आणखी एका आरोपीस दुहेरी जन्मठेप व एकास पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली. कौसल्याची आई अन्नलक्ष्मी व मामा पंडीदुराई यांच्यासह तिघांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले गेले. न्यायालयाने दोषी ठरलेल्या सर्व आरोपींना मिळून एकूण ११.४७ लाख रुपयांचा दंडही ठोठावला. दंड वसूल झाल्यावर ती रक्कम भरपाई म्हणून शंकरच्या कुटुंबियांना व कौसल्यास देण्याचाही आदेश झाला. (वृत्तसंस्था)बसस्टँडवर केली हत्यापोलाच्ची येथील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना शंकर व कौसल्याचे प्रेम जुळले व त्यांनी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता विवाह केला.यानंतर तीनच महिन्यांनी १३ मार्च २०१६ रोजी उदुमालपेट येथील बसस्टँडवर जमावाने भरदिवसा शंकर व कौसल्या यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.त्यात शंकरचा मृत्यू झाला, तर कौसल्या गंभीर जखमी झाली. या हल्ल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि या ‘आॅनर किलिंग’ने राज्यभर गहजब झाला.