बाराबंकी (उत्तर प्रदेश) : विषारी दारू प्याल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जणांसह सहा जणांचा मृत्यू झाला असून, किमान २० जण आजारी पडले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.या घटनेला राजकीय कट-कारस्थानाचे अंग आहे का, याचीही चौकशी केली जाणार आहे. ४८ तासांत चौकशीचा अहवाल मागवण्यात आला आहे. अबकारी विभागाचे १० आणि दोन पोलीस अधिकाऱ्यांना याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे, असे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले.सोमवारी रात्री राणीगंज आणि शेजारच्या खेड्यांतील लोकांनी रामनगर भागातील दुकानातून ही दारू विकत घेतली. मंगळवारी पहाटे हे लोक आजारी पडल्यामुळे त्यांना रामनगर येथील आरोग्य केंद्रात दाखल केले गेले. त्यांच्यापैकी किमान १६ जणांना लखनौतील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तेथे त्यांच्यावर डायलेसीसचा उपचार सुरू असून, पाच ते सहा जणांना लखनौतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये व बलरामपूरला आणण्यात आले. रुग्णालयांत जे लोक आहेत त्यांना शक्य ती सर्व वैद्यकीय सेवा देण्याचे आदेश दिले गेले आहेत. (वृत्तसंस्था)>१२ अधिकारी निलंबितबाराबंकी जिल्हा अबकारी अधिकारी शिव नारायण दुबे, अबकारी निरीक्षक रामतीर्थ मौर्य, तीन हेड कॉन्स्टेबल्स आणि अबकारी विभागाचे पाच कॉन्स्टेबल्स तात्काळ निलंबित केले गेले आहेत. पोलीस मंडळ अधिकारी पवन गौतम आणि स्टेशन हाऊस अधिकारी राजेश कुमार सिंह यांनाही कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशात विषारी दारूने घेतला सहा जणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 4:58 AM