पालघर/बोर्डी : गुजरातच्या मांगलोर बंदरात अडकलेल्या १७ ट्रॉलर्समधून सुमारे १५०० खलाशी कामगार रविवारी गुजरातच्या नारगोल बंदरात दाखल झाले. त्यातील ९३ कामगारांना डहाणू तालुक्याच्या किनाऱ्यावर उतरविण्यात आले असून तपासणीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आपल्या कुटुंबाच्या ओढीने घरी येण्यासाठी २० ट्रॉलर्समधून १५०० ते दोन हजार खलाशी सोमवारी येण्याच्या मार्गावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ट्रॉलर्स मालकांनी कुठलीही परवानगी न घेतल्याने गुन्हा दाखल करून ती ट्रॉलर्स जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहे.
गुजरातच्या पोरबंदर, ओखा, वेरावल तर सौराष्ट्रमधील मांगलोर येथील बंदरात खलाशी कामगार म्हणून रोजगारासाठी गेलेल्या १८०० कामगारांना ४ एप्रिल रोजी नारगोलच्या बंदरात उतरविण्यात आले होते. त्यातील १,१२२ खलाशी गुजरातमधील तर १०० ते १५० खलाशांना त्यांच्या जिल्हा प्रशासनाने स्वीकारले होते. मात्र, पालघर जिल्ह्यातील ५०० ते ६०० कामगारांना महाराष्ट्र सरकारने स्वीकारण्यास परवानगी नाकारल्याने त्यांना माघारी पोरबंदरमध्ये परतावे लागले होते. आपल्या सुटकेसाठी कुठलेच प्रयत्न केले जात नसल्याने त्या खलाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा माघारी आणण्यासाठी गुजरात सरकारशी बोलत असल्याचे सांगितले जात असताना कुठल्याही हालचाली न झाल्याने गुजरातच्या बंदरात काही खलाशांचा उद्रेक होत जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. मात्र, आता शनिवारी सौराष्ट्रजवळील मांगलोर बंदरातून १४ ट्रॉलर्समधून १४५५ खलाशी नारगोल बंदराकडे रवाना झाले होते. रविवारी दुपारी या ट्रॉलर्समधून १३६२ कामगारांना नारगोल बंदरातील प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतले. तर ‘जय वेरावली कृपा’ ही ट्रॉलर्स पालघरच्या झाई बंदरात आणण्यात येऊन त्यातून ९३ कामगारांना उतरविण्यात आले.या वेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणा या कामगारांनी आपल्या बंदरात आल्यावर दिल्या. डहाणूचे उपजिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी घटनास्थळी भेट देत या सर्व कामगारांची तपासणी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेतले. या वेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार विनोद निकोले, माजी आमदार पास्कल धनारे, तहसीलदार स्वाती घोंगडे आदी उपस्थित होते.ट्रॉलर्स मालकाविरोधात गुन्हा दाखलविनापरवानगी आपल्या भागात आल्याचा ठपका ठेवीत उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्या ट्रॉलर्स मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या घराच्या ओढीने वेरावल बंदरातून १३, तर ओखा बंदरातून ७ अशा एकूण २० ट्रॉलर्समधून सुमारे १६०० कामगार नारगोल व पालघरकडे निघाले आहेत.