नवी दिल्ली : कोरोनापाठोपाठ आता देशात बर्ड फ्लूचे संकट ओढावले आहे. सध्या केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे शुक्रवारी केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. या सहा राज्यांनी कृती योजनांद्वारे प्रादुर्भाव नियंत्रणात आणावा, अशी सूचनाही केंद्र सरकारने केली आहे.
राजधानी दिल्लीतील हस्तसल गावातील डीडीए उद्यानात १६ पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाल्याचे आढळले असून त्यांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. याचबरोबर, एका अधिकृत निवेदनामध्ये म्हटले की, केरळच्या दोन बाधित जिल्ह्य़ांमधील कत्तल प्रक्रिया पूर्ण झाली असून तेथे र्निजतुकीकरण सुरू आहे. ज्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालेला नाही त्यांना, पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाल्याचे आढळल्यास त्याची त्वरित माहिती द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. केरळ, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या बाधित राज्यांमध्ये केंद्राची पथके पाठविण्यात येणार आहेत.
सरकारने सांगितले की, आयसीएआर-निषादने (ICAR-NIHSAD) नमुने तपासल्यानंतर हरयाणाच्या पंचकुला येथील दोन पोल्ट्री फर्ममध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझा संसर्गाची पुष्टी झाली. तर गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील स्थलांतरित पक्ष्यांमध्ये तसेच सवाई माधोपूर, पाली, जैसलमेर आणि राजस्थानमधील मोहर जिल्ह्यात कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पशुधन व दुग्ध विभागाने कृती योजनेनुसार बाधित राज्यांना रोगावर नियंत्रण ठेवण्याची सूचना केली आहे.
दरम्यान, हरयाणातील पंचकुला जिल्ह्यात काही पक्ष्यांचे नमुने घेतले असता बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाल्याने एक लाख ६० हजार कोंबड्यांची कत्तल करावी लागणार आहे, असे राज्याचे कृषी मंत्री जे.पी. दलाल यांनी सांगितले. तर पंजाब सरकारने दुसऱ्या राज्यांमधून येणाऱ्या पोल्ट्री प्रोडक्टवर सात दिवसांसाठी बंदी घातली आहे.