श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी रात्रीपासून सुरक्षा दलांबरोबर दोन वेगवेगळ्या चकमकींत तीन दहशतवादी ठार झाले. काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांत झालेल्या तीन चकमकींत एकूण सहा दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली आहे.काश्मीर खोऱ्यातील कुलगाम जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, तर त्याचे दोन साथीदार अंधारात पळून गेले.हंडवारा जिल्ह्यामध्ये गनीपोरा क्रालगुंड भागात बुधवारी रात्री झालेल्या स्वतंत्र चकमकीत लष्कर-ए-तय्यबा या संघटनेचा कमांडर नासीरउद्दीन लोन याच्यासह दोन दहशतवादी मारले गेले.सोपोर व हंडवारा येथे काही दिवसांपूर्वी लोन व त्याच्या साथीदारांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते.गेल्या चार दिवसांत काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत ठार झालेल्या सहा दहशतवाद्यांपैकी चार जणांचा दहा मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश होता, असे जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले.ते म्हणाले की, गेल्या चार दिवसांत सुरक्षा दलांबरोबर बारामुल्ला जिल्ह्यातील क्रिरी येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. त्यामध्ये लष्कर-ए-तय्यबाचा उत्तर काश्मीरचा कमांडर सज्जाद हैदर याचा समावेश होता.जे अन्य दोन जण ठार झाले त्यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी उस्मान व काश्मीरमधील स्थानिक नागरिक असलेल्या अनायतुल्ला यांचा समावेश आहे.>तरुणांची माथी भडकविण्याचे कामकमांडर सज्जाद हैदर स्थानिक काश्मिरी युवकांची माथी भडकाविण्याचे काम करीत होता. हंडवारामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव नासिरुद्दीन लोन असे असून, तो लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर होता. काश्मीरमधील सोपोरमध्ये मंगळवारी शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. मात्र, त्याची ओळख पटलेली नाही.
काश्मीरमध्ये चार दिवसांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 5:05 AM