सिल्चर- राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन तृणमूल काँग्रेसने गेले तीन दिवस अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर थेट आरोप करत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेणं सुरु केलं तर त्यांच्या पक्षाच्या काही सदस्यांनी आसामची वाट धरली. मात्र सिल्चरमध्ये विमानतळावर या शिष्टमंडळाला अडवण्यात आले व रात्रभर तेथेच रोखून धरण्यात आलं होतं.
या शिष्टमंडळातील सदस्य आणि खासदार शेखर रे यांनी आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला तसेच शिष्टमंडळातील महिलांशी गैरवर्तन केले असेही ते म्हणाले. खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी शेखर रे यांच्या म्हणण्याला दुजोरा देत तसाच आरोप केला. तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार तृणमूलच्या सदस्यांनीच गैरवर्तनाला सुरुवात केली आणि पोलिसांना जखमी केले.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबद्दल केंद्र सरकार व आसाम सरकारवर टीका करत हा सगळा राजकीय बदला घेण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. आसाम सरकार केंद्रसरकारप्रमाणे असं का वागत आहे, भाजपा शक्तीचा वापर करत आहे असा आरोप त्यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी आपल्या जुन्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत यू टर्न घेतला असला तरी तृणमूलमध्ये मात्र धुसफूस सुरु आहे. तृणमूल काँग्रेसच्या आसाम प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देऊन ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे स्पष्ट करुन टाकले.