Air India मधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एअर इंडियाचा प्रत्येक सहावा कर्मचारी हा कोरोना बाधित आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे एअर इंडियाच्या १९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संसदेत लेखी स्वरूपात याबाबत माहिती दिली. १ फेब्रुवारीपर्यंत एअर इंडियाच्या एकूण १९९५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये वंदे भारत या मोहिमेच्या सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. कोरोनाबाधितांपैकी एकूण ५८३ जण हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. संसदेत लेखी स्वरूपात हरदीप सिंग पुरी यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांद्वारे देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार १ जानेवारीपर्यंत एअर इंडियाकडे १२,३५० कर्मचारी होते. त्यापैकी ८,२९० स्थायी कर्मचारी तर ४,०६० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी आणि एअर इंडियाच्या आरोग्य विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्याच मार्गदर्शक सूचनांद्वारे काम करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, मागील आठवड्यात पुरी यांनी ही माहिती दिली होतीभारतात, चौथ्यांदा फेब्रुवारीमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या १० हजारांपेक्षा कमी ९,१२१ इतकी होती. त्यानंतर देशातील कोरोना बाधितांची संख्या वाढून १,०९,२५,७१० झाली आहे. या महिन्यात दहाव्यांदा कोरोनाच्या संक्रमणामुळे एका दिवसात १०० पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात विषाणूमुळे आणखी ८१ लोकांचा मृत्यू झाल्याने आता एकूण मृतांची संख्या वाढून १,५५,८१३ झाली आहे.आतापर्यंत देशात १,०६,३३,०२५ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तसंच आतापर्यंत रुग्ण बरे होण्याचा दरही ९७.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा १.४३ टक्के आहे. देशात सध्या दीड लाखांपेक्षाही कमी रुग्णावर उपचार सुरू आहेत.
Air India चा प्रत्येक सहावा कर्मचारी कोरोनाबाधित, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 3:59 PM
Air India : नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिली माहिती, वंदे भारत मोहिमेतील कर्मचाऱ्यांचाही समावेश
ठळक मुद्देवंदे भारत मोहिमेतील वंदे भारत मोहिमेतील कर्मचाऱ्यांचाही समावेश१९९५ कर्मचाऱ्यांना १ फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची लागण