श्रीहरीकोटा (आंध्र प्रदेश) : पीएसएलव्ही सी ३२ या प्रक्षेपकाद्वारे गुरुवारी आयआरएनएसएस-१ एफ या सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वीरीत्या प्रक्षेपण झाले. संध्याकाळी ४.०१ वाजता प्रक्षेपक अवकाशात झेपावल्यानंतर हा उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडला गेला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सात दिशादर्शक उपग्रहांच्याप्रक्षेपणाची योजना आखली असून आयआरएनएसएस-१ एफ हा या मालिकेतील सहावा उपग्रह आहे.त्यामुळे भारताला अमेरिकेच्या जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) या स्थितीदर्शक यंत्रणेच्या तोडीची सेवा देणे शक्य होणार आहे. गुरुवारी झालेले सदर उपग्रहाचे प्रक्षेपण नियोजितरीत्या तंतोतंत (कॉपीबुक स्टाईल) पार पडले. यापूर्वी जुलै २०१३ मध्ये या मालिकेतील पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण झाले होते.ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यान सी-३२ ने उपग्रह योग्यरीत्या कक्षेत सोडला आहे. क्षेत्रीय दिशादर्शक यंत्रणा पूर्ण करण्यासाठी केवळ एका उपग्रहाचे प्रक्षेपण व्हायचे आहे, हे काम पुढील महिन्यात होण्याची आशा आहे, असे इस्रोचे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी मिशन कंट्रोल सेंटरमध्ये जल्लोष साजरा करताना म्हटले. (वृत्तसंस्था)
सहावा दिशादर्शक उपग्रह अंतराळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2016 3:23 AM