अजनाला :पंजाबमधील अजनाला येथे २०१४ साली एका विहिरीत सापडलेले सुमारे २५० मानवी सांगाडे हे १९४७ साली फाळणीच्या वेळी हत्या झालेल्यांचे नसून १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झालेल्यांचे आहेत, असे आता नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे याआधी केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षांना पुष्टी मिळाली आहे.
डीएनएनवर आधारित पुरावे तसेच स्ट्रोन्टियम आयसोटोप विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे की हे सांगाडे अजनाला व परिसरातील लोकांचे नव्हे तर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा येथे राहत असलेल्यांचे आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींची माहितीही संशोधकांनी शोधून काढली.
यासंदर्भातील एक लेख इंटरनॅशनल जर्नल ऑफ लिगल मेडिसीन या नियतकालिकामध्ये नुकताच प्रसिद्ध झाला. पंजाब विद्यापीठ, लखनऊतील बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्स, कॅनडातील मेमोरियल विद्यापीठ यांनी संयुक्तरीत्या हे संशोधन केले आहे. पंजाब विद्यापीठातील फोरेन्सिक अँथ्रॉपॉलॉजिस्ट डॉ. जे. आर. सेहरावत यांनी या संशोधनात प्रमुख भूमिका बजावली आहे.
असे केले संशोधन
सापडलेल्या मानवी सांगाड्यांतून संशोधकांनी गोळा केलेल्या ५० डीएनए नमुन्यांचे माइटोकॉन्ड्रियल डीएनए विश्लेषण केले. तर ८५ नमुन्यांचे ऑक्सिजन आयसोटोप विश्लेषण केले. खाण्यापिण्याच्या सवयी जाणून घेण्यासाठी ऑक्सिजन आयसोटोप विश्लेषण उपयोगी ठरते. या नमुन्यांचे कॅनडाच्या मेमोरियल विद्यापीठातील विश्लेषणात हे सांगाडे १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यातील योद्ध्यांचे असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.